ठाण्यातील कोपरी येथील नियोजित सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची जिल्हाधिकारी तसेच सहकार उपनिबंधक यांच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी विधानसभेत केली.
सिद्धिविनायक  गृहनिर्माण संस्थेतर्फे कोपरी येथे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने या संस्थेस १७ गुंठे जमीन दिली आहे. मात्र सहकारी संस्थेच्या नावाने जमीन मिळाल्यानंतर आता ती बिल्डराच्या घशात घालण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने अलिकडेच या संस्थेतील २४ सदस्यांना डावलून परस्पर दुसऱ्या व्यक्तींना सदस्य करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश डहाके यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नावरील चच्रेदरम्यान थोरात यांनी ही घोषणा केली. या संस्थेतील काही सभासदांनी स्वतहून राजीनामा दिल्याचा मुख्य प्रवर्तकाचा दावा आहे. मात्र, अन्य सभासदांनी स्वच्छेने राजीनामे दिले की कोणाच्या दबावाखाली, तसेच नवे सभासद या योजनेसाठी पात्र आहेत का? याची सर्व चौकशी ठाण्याचे जिल्हाधिकारी, सहकार उपनिबंधक यांच्या माध्यमातून करण्यात येईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाने सभासदांची पात्रता तपासण्याचे आदेश दिल्याचे थोरात म्हणाले.