टीएमटीच्या नावाखाली खासगी बस प्रवासी वाहतूक करणार
ठाणे स्थानक ते घोडबंदर या मार्गावरील अवैध बस वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची होणारी कुचंबणा थांबविण्यासाठी ठाणे महापालिकेने अफलातून योजना आणली असून या मार्गावर धावत असलेल्या खासगी बसगाडय़ा ठाणे परिवहन सेवेत (टीएमटी) भाडेतत्वावर सामावून घेण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळा बसणार आहेच; पण त्याचबरोबर ठाणेकरांच्या प्रवासाचा प्रश्नही मिटणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर गेली अनेक वर्षे पन्नासहून अधिक अवैध बसगाडय़ा धावतात. उत्तम सुविधा मिळत असल्यामुळे या बसगाडय़ांकडे प्रवाशांचा कल वाढला. मात्र, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या आदेशाने खडबडून जाग आलेल्या आरटीओने या बस गाडय़ांविरोधात कारवाई सुरू केली. त्यामुळे अवैध वाहतूक कमी झाली. मात्र, प्रवाशांसमोर अडचणी उभ्या राहिल्या. टीएमटीकडे पुरेशा बसगाडय़ा नसल्याने प्रवाशांना रिक्षांनी प्रवास करावा लागत आहे. याचा गैरफायदा घेत रिक्षाचालकांकडून मनमानी शुल्कआकारणी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेनेच नवा वाहतूक ‘पॅटर्न’ शहरात राबवण्याचा विचार चालवला आहे.
डावखरे यांनी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता, खासगी बसगाडय़ांच्या संघटनेचे प्रतिनिधी, प्रवासी महासंघ, टीएमटी, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि आरटीओ अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक घेतली. त्यामध्ये असीम गुप्ता यांनी खासगी बसगाडय़ा टीएमटीमध्ये सामावून घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला. टीएमटीच्या ताफ्यात नवीन बस गाडय़ा दाखल होण्यासाठी अजून पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. पण, तोपर्यंत ठाणेकरांना वाहतूकीच्या दृष्टीकोनातून सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ठाणे ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या खासगी बस गाडय़ा वाहन चालकासह टीएमटीच्या सेवेत सामावून घ्याव्यात, असा प्रस्ताव शुक्रवारी बैठकीत मांडला आहे, अशी माहिती असीम गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या बस गाडय़ांमध्ये टीएमटी वाहक असतील. तसेच किलोमीटरवर दर ठरवून खासगी बसच्या मालकांना पैसे देण्यात येतील. या प्रस्तावामुळे शहरातील प्रवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल. शासकीय नियमाची पुर्तता करून या बस गाडय़ा घेण्यात येतील. त्या बसची कागदपत्रे आणि वाहनचालकांकडे वाहन परवाना आहे का, या सर्व बाबींचा विचार करण्यात येईल.
असीम गुप्ता, ठाणे महापालिका आयुक्त