तीन आरोपींना अटक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : मुंब्रा येथील कादर पॅलेस भागातील इमारतीमध्ये बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालविणाऱ्या तीन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सीमकार्ड, वायफाय राऊटर, लॅपटॉप आणि अ‍ॅन्टीना केबल असा एकूण १४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांपैकी एका आरोपीकडे गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे सापडली आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या टेलीफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय दूरध्वनी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातून येत असल्याचे भासविले जात होते. या दूरध्वनीची डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन विभागाकडे नोंद होत नसल्यामुळे शासनाचा महसूल बुडविण्यात येत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. तसेच या दूरध्वनीचा वापर देशविघातक तसेच अन्य गैरकृत्यांसाठी करण्यात आला आहे का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

शेहजाद निसार शेख (३०), शकील अहमद शेख (४०), मोहमद हलीम खान (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगडचे रहिवासी असून ते मुंब्य्रातील कादर पॅलेस भागातील इमारतीमध्ये राहतात. सोमवारी रात्री तिन्ही घरांवर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईदरम्यान याच भागात राहणाऱ्या वसीलउल्ला शेख (३५) याच्याही घरात पोलिसांनी छापा मारीत बेकायदा टेलीफोन एक्स्चेंजवर कारवाई केली. मात्र, धाडीचा सुगावा लागल्यामुळे वसीलउल्ला याने आधीच पोबारा केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत चौघांच्या घरातून एकूण १९ स्लीम स्लॉट बॉक्स, ३७ वायफाय राऊटर, २९१ व्होडाफोन आणि एअरटेलचे सीमकार्ड असा तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शेहजाद शेख याच्याकडे एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे सापडली आहेत. ‘हॅलो गल्फ’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे टेलीफोन एक्स्चेंज चालविले जात होते, अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली.

कार्यपद्घती अशी..

सिम बॉक्सला राऊटरच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्शन जोडण्यात आले होते. या यंत्रणेमध्ये त्यांनी विविध सिमकार्ड बसविले होते. या यंत्रणेद्वारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल प्राप्त करून ते भारतीय मोबाइल क्रमांकाशी जोडले जायचे. त्यामुळे परदेशातील क्रमांकाऐवजी त्या ठिकाणी भारतातील क्रमांक दिसायचे. आंतरराष्ट्रीय कॉलच्या तुलनेने हे कॉल स्वस्त होते. या दूरध्वनीची डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन विभागाकडे नोंद होत नसल्यामुळे शासनाचा महसूल बुडविला जात होता. तसेच नोंदीअभावी सुरक्षा यंत्रणांना या दूरध्वनीचा तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा दूरध्वनीचा वापर देशविघातक किंवा गैरकृत्यांसाठी करण्यात आला आहे का, या दिशेने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.