सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वतचा राजकीय प्रचार करण्याच्या नेतेमंडळींच्या उत्साहावर ठाणे पोलिसांनी काढलेल्या आदेशामुळे पाणी फेरले गेले आहे. गणेशोत्सव साजरा होतो ती ठिकाणे धार्मिक संस्थांची व्यासपीठे आहेत, त्यामुळे अशा व्यासपीठावरून राजकीय पक्षांच्या नावाचा वापर करण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. या नव्या आदेशामुळे राजाश्रय लाभलेली गणेशोत्सव मंडळे आणि पोलिसांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ठाणे पोलिसांनी यासंबंधीच्या नोटिसाही काही गणेशोत्सव मंडळांना बजावल्या आहेत. या नोटिसांचे उल्लंघन केल्यास आणि धार्मिक स्थळांचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. यानुसार पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. धार्मिक स्थळांचा (गैरवापर प्रतिबंध) अधिनियम १९८८ चे कलम ३, ५ आणि ६ चा आधार घेण्यात आला असून या कलमांचे उल्लंघन केल्यास कलम ७ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून त्यात पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे  मंडळांनी राजकीय पक्षाच्या लाभासाठी कोणताही समारंभ, सण आणि लोकांना जमविणे यांसारखे प्रकार करू नयेत, असे आदेश निघाले आहेत.
पोलिसांची आचारसंहिता..
आचारसंहितेनुसार उत्सव मंडळांना यापुढे राजकीय हालचाली, राजकीय पक्षांची जाहिरात करणे, तसेच एखाद्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाची जाहिरात करता येणार नाही. याशिवाय कायद्याने बंदी असलेल्या वस्तूंचा साठा करणे, परवानगी नसताना खोदकाम आणि भिंत बांधणे, संबंधित मंडळाच्या जागेसंदर्भात न्यायालयाने यापूर्वी कोणतेही आदेश पारित केले असतील तर त्याचा अवमान करणे, भारताची एकता व अखंडता धोक्यात येईल अशा प्रकारचे कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणे, राष्ट्रीय सन्मानतेचा अपमान करणे, अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये, अशा सूचना पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना दिल्या आहेत.

ठाण्यातील राजकीय उत्सव मंडळे
वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रछायेखाली पाचपाखाडी भागात गणेशोत्सव, तर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे आणि रवींद्र फाटक यांच्या छत्रछायेखाली नवरात्रोत्सव शहरात साजरा होतो.

दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणारी विविध ‘सार्वजनिक उत्सव मंडळे’ धार्मिक संस्थेच्या अधिनियमाखाली येतात. कायद्यानुसार धार्मिक स्थळांचा वापर इतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय कामकाजासाठी अथवा प्रचारासाठी करू नये.     
ठाणे पोलीस

या कायद्याविषयी अनेक मंडळांना माहिती नसल्यामुळे त्याचे ज्ञान व्हावे, यासाठी या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा कायदा सर्वच सणांसाठी लागू असतो. त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त