संदीप आचार्य 
मुंबई : वारली चित्रकला ही बारक्याची खासीयत. यातूनच चार पैसे मिळायचे आणि संसाराचा गाडा चालायचा. करोनाने राज्यातील हजारोंचे रोजगार बुडाले. घर-संसार कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला. ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे राहणाऱ्या बारक्यापुढेही करोनामुळे जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आणि चित्र काढणे सोडून तो भाजी विकायचे काम करायला लागला. बारक्यासरख्या जातीच्या कलावंताची अडचण लक्षात घेऊन ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या मदतीमुळे बारक्या आपल्या कुटुंबाला दोन वेळच पोटभर जेवण देऊ शकतो पण त्याहीपेक्षा त्याचे कलावंत हात पुन्हा एकदा वारली चित्र काढू लागले हे जास्त महत्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज शेकडो चित्रकार व शिल्पकार करोनामुळे बेरोजगार झाले आहेत. घर-संसार चालवण्याचं आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाल्यानंतर यातील बहुतेकांनी आपल्या हातातील ब्रश खाली ठेवला… शिल्प घडविण्याचा विचार सोडून दिला आणि पडेल ते काम आपला कुटुंबाच्या उदरभरणासाठी करायला सुरुवात केली. अनेक ग्रामीण भागातील अनेक चित्रकार व शिल्पकार आज पोट भरण्यासाठी वेल्डिंग, मजुरीपासून ते दारोदार भाजी विकण्यापर्यंत पडेल ते काम करत आहेत. करोनाचा ‘फेरा’ किती काळ चालेल याची आजतरी कोणीच निश्चित खात्री देऊ शकत नाही. जरी करोनावर उपचार सापडला तरी अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत सुरु होऊन या ग्रामीण तसेच शहरी भागातील चित्रकार व शिल्पकरांना त्यांच्या ‘कलेचे मोल’ कधी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही.

कोणे एकेकाळी कलावंत, गायक व चित्रकार यांना ‘राजाश्रय’ असायचा. आता कलेची जाण असणारे राजकारणीच जिथे विरळ आहेत तेथे कलावंतांना आश्रय कोण देणार हा प्रश्नच आहे. १०२ वर्षे जुनी असलेल्या ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या चित्रकार व शिल्पकारांच्या संघटनेने नेमकी ही अडचण हेरली. आपल्या अडचणीत सापडलेल्या भावंडांना आज मदतीची गरज आहे हे लक्षात घेऊन ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ मदतीचा हात पुढे करण्याची योजना आखली. संस्थेचे अध्यक्ष वासुदेव कामत, उपाध्यक्ष रवी देव, सचिव विक्रांत शितोळे, सदस्य साधना खडपेकर यांच्यासह अकरा सदस्यांच्या समितीने निधी संकलनास सुरुवात केली. मदतीची सुरुवात स्वत: च्या घरातून करण्याचा निर्णय घेऊन संस्थेच्या बाराशे सदस्यांना निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. यातून तीन हजार ते लाखभर रुपयांपर्यंतची मदत बहुतेक कलावंतांनी केली.

एक निश्चित रक्कम जमा झाल्यावर संस्थेने गरजू चित्रकार व शिल्पकारांकडून मदतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली. आजघडीला संस्थेकडे तीनशेच्या आसपास अर्ज आले असून पहिल्या टप्प्यात अर्जांची छाननी करून सुमारे ५० कलावंतना मदत करण्यात आली आहे. याबाबत साधना खडपेकर यांना विचारले असता, “पुणे, नाशिक, सांगली, नगर, डहाणू, पालघर आदी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अर्ज तर आलेच पण काही अर्ज अन्य राज्यातूनही आले आहेत. एका समितीच्या माध्यमातून अर्जाची तपासणी केल्यानंतर दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे तीन महिने मदत केली जाणार आहे. अपेक्षा ही आहे की जेव्हा या कलावंतांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हा त्यांनी मदतीची रक्कम संस्थेला परत करावी. यामुळे भविष्यात अनेकांना मदत करणे शक्य होईल. एका वारली चित्रकारांना आम्ही मदत करण्यास सुरुवात केली तेव्हा ‘आता मला पुन्हा चित्र काढता येतील’ हे त्यांचे उद्गार बरंच काही सांगून गेले”, असे साधना खडपेकर म्हणाल्या.

करोनामुळे आज शेकडो कलावंत बेरोजगार झाले आहेत. स्वत: मधील कलेला मारून त्यांना पडेल ते काम आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी करावे लागत आहे. एकीकडे आर्थिक विवंचना तर दुसरीकडे स्वत: मधील कलावंत कलासाधनेअभावी रोज थोडा थोडा संपताना पाहाण्याचे  दुःख सोसणे हे सध्या या चित्रकार व शिल्पकारांच्या ललाटीचे भाग्य बनले आहे. पण ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ने या कलावंतांना मदतीचा हात देऊन त्यांच्यातील कलावंताला पुन्हा उभे राहाण्याची एक ताकद दिली आहे.