मेट्रो प्रशासनाकडून रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था

माहीम येथील लक्ष्मी निवास इमारतीला मेट्रो-३च्या कामामुळे तडे गेले आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने ही इमारत रिकामी केली असून रहिवाशांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

माहीम परिसरात एल. जे. रस्त्यावर लक्ष्मी निवास ही निवासी इमारत आहे. या रस्त्यावर कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी असलेल्या ‘मेट्रो ३’च्या शीतलादेवी स्थानकाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामादरम्यान इमारतीच्या ढाच्याला तडे गेले. कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला आणि त्यामुळे इमारतीच्या ढाच्याला तडे गेले, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. रहिवाशांनी शनिवारची रात्र इमारतीतच काढली.

रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा इमारतीला तडे गेल्याची तक्रार रहिवाशांकडून आल्याने मेट्रो-३चे काम करणाऱ्या ‘एमएमआरसीएल’ने इमारतीची पाहणी केली. इमारतीला हानी झाल्याची खात्री पटल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांना ‘एमएमआरसीएल’ने इमारत खाली करण्यास सांगितले. ‘एमएमआरसीएल’ने एका हॉटेलमध्ये या रहिवाशांची तात्पुरती राहण्याची सोय केली आहे. काही रहिवाशांनी या हॉटेलमध्ये आसरा घेतला आहे. तर काहींनी नातेवाईकांच्या घरी राहणे पसंत केले आहे.

‘शनिवारी रात्रीच्या सुमारास इमारतीला धक्के बसत असल्याचे जाणवले. आम्ही घाबरलो. परंतु रात्रीच्या वेळेस कुठे जाणार म्हणून जीव मुठीत धरून रात्र काढली. दुसऱ्या दिवशी मेट्रोकडून इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र रविवारी दुपारीच इमारतीला आणखी तडे गेल्याने ती खाली केली. पुढचे तीन ते चार दिवस बाहेर राहावे लागेल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. तोपर्यंत इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे की नाही ते कळेल. तोपर्यंत आम्ही नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे,’ अशी माहिती रहिवासी इक्बाल हाश्मी यांनी दिली. मेट्रो प्रशासनाकडून इमारतीच्या संरचनात्मक परीक्षणाचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते.

‘शीतलादेवी स्थानकाच्या बांधकामादरम्यान झालेली गळती आता थांबली आहे. लक्ष्मी निवास इमारतीचे लेखापरीक्षण करण्यात येत असून त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणे अपेक्षित आहे. इमारतीच्या परीक्षण अहवालानुसार सदर इमारतीची आवश्यक डागडुजी एमएमआरसीएलच्या कंत्राटदारकडून केली जाईल. इमारतीतील कुटुंबांचे स्थलांतर तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या हॉटेलमध्ये करण्यात आले आहे, असे ‘एमएमआरसीएल’च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

आधीही तक्रारी होत्या

मेट्रोकामांमुळे इमारतीला तडे गेल्याच्या अनेक तक्रारी याआधीही विविध भागांतून नागरिकांनी केल्या होत्या. मात्र याला मेट्रोचे काम कारणीभूत नसल्याचा दावा एमएमआरसीएलकडून तेव्हा करण्यात आला होता. दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूला मेट्रो-३च्या कामांमुळे तडा गेल्याची तक्रार होती. मात्र मेट्रोने हा आरोप फेटाळत हात झटकले होते. गिरगाव भागातील जुन्या इमारती, सेंट तेरेसा चर्च, त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील अनेक इमारतींनी याआधी या प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. काहींनी या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते.