राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेते गैरहजर राहिले आहेत. यावरून अधिवेशनापूर्वीच विरोधकांतील मतभेद उघड झाले आहेत.

या बैठकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेणे अपेक्षित असताना आता या पत्रकार परिषदाही वेगवेगळ्या होणार असल्याचे कळते. दुपारी ३ वाजता विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता संध्याकाळी ४ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. आज संध्याकाळी सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतही विरोधीपक्ष काय भुमिका घेतील हे पत्रकार परिषदांनंतरच स्पष्ट होईल.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असली, तरी ती फसवी आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. त्याशिवाय तूर खरेदीचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील, उघडकीस आलेले घोटाळे, कायदा व सुव्यवस्था, विशेषत: भायखाळा तुरूंगात मंजुळा शेट्ये या वॉर्डनचा झालेला खून, शिक्षणातील गोंधळ इत्यादी मुद्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे भांडवलकरून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनच सत्ताधारी व विरोधकांमध्ये रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता विरोधकांमधील मतभेद उघड झाल्याने त्यांच्याकडून कोणती राजकीय भुमिका घेतली जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे.