दहा नव्या सेवांची घोषणा सध्या तरी ‘सायडिंग’ला
हार्बर मार्गावर डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतर प्रवाशांना त्याचा थेट फायदा मिळवून देण्यासाठी १० नव्या सेवा चालू करण्याची घोषणा महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांच्या अंगलट आली आहे. अशा नव्या सेवा चालवण्याची मध्य रेल्वेची सध्या तरी तयारी नसून त्याऐवजी १२ डबे गाडय़ांच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे तसेच येत्या १५ दिवसांत हार्बर मार्गावर पहिली १२ डब्यांची गाडी चालवण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिले आहे. तूर्तास काही दिवस ही एकच १२ डब्यांची गाडी चालणार असली, तरी ठरावीक दिवसांनंतर या गाडय़ांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी वहन क्षमतेत ३३ टक्क्य़ांनी वाढ होणार आहे.
हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी सुरू करण्यापूर्वी डॉकयार्ड रोड येथे फलाटाची लांबी वाढवण्याची मोठी अडचण येत होती. मात्र मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने हे काम अत्यंत वेगाने पूर्ण केले असून त्यामुळे १२ डब्यांची गाडी चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गाडय़ा उभ्या करण्यासाठीच्या स्टेबलिंग लाइन्स आणि कारशेडमधील मार्गिकाही हळूहळू १२ डब्यांमध्ये परावर्तित करण्यात येत आहेत. हे कामही येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. मात्र त्यासाठी न थांबता येत्या १५ दिवसांत हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. हार्बर मार्गावर १० नव्या सेवा चालू करण्याऐवजी या मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करणे जास्त फायद्याचे आहे. सध्या या मार्गावर ९ डब्यांच्या ३६ गाडय़ांमार्फत दिवसभरात ५९० फेऱ्या चालवल्या जातात. या ३६ गाडय़ांना प्रत्येकी ३ डबे जोडल्यास गाडय़ांची प्रवासी वहन क्षमता ३३ टक्क्य़ांनी वाढते. ही क्षमता वाढवणे हे ९ डब्यांच्या १९० जादा सेवा चालवण्यासारखे आहे. त्यामुळे मध्य रेल्वे या प्रकल्पाला जास्त प्राधान्य देत असल्याचे ओझा यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला या मार्गावर एक गाडी १२ डब्यांची असेल. त्यामार्फत १२ सेवा दिवसभरात चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेकडून येणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या गाडय़ा मध्य रेल्वेवर दाखल होतील. पुढील तीन ते चार महिन्यांत हार्बर मार्गावरील सर्व ३६ गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात येतील, असेही ओझा यांनी सांगितले.

प्रकल्प पूर्ण होण्यास दीड वर्षांचा विलंब
हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ांचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०१४ ही कालमर्यादा होती. मात्र आता तब्बल दीड वर्षांच्या दिरंगाईने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्डात बदल, वडाळा स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, डॉकयार्ड रोड स्थानकातील लांबी वाढवणे या तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे हा प्रकल्प रखडला होता. सीएसटी यार्डात सुरुवातीला ४० दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. हा ब्लॉक अखेर ७२ तासांवर आला. तसेच डॉकयार्ड रोड येथील कामाला विशेष विलंब लागल्याने हा प्रकल्प लांबल्याचे ओझा यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ७५० कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे.