केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी फडणवीसांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्री बनवण्यात आले होते असा दावा भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु झाली असून ते भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, हा मुद्दा आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार हेगडेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले, “जर महाराष्ट्राला मिळालेला निधी फडणवीसांनी केंद्राकडे परत पाठवला असेल तर हे क्लेशदायक आहे. त्यामुळे हे प्रकरण आम्ही आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडू.”

केंद्र सरकारचा ४० हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांचे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये त्यांनी हा निधी पुन्हा केंद्राकडे पाठवून दिल्याचा दावा भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना केला होता. हेगडेंच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हेगडेंचा हा दावा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला असून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेल्या माहितीवर वक्तव्य करण्यापेक्षा पुराव्यानिशी बोलण केव्हाही चांगलं, अशा शब्दांत त्यांनी हेडगेंना सुनावलं आहे.