संदीप आचार्य / निशांत सरवणकर

करार रद्द झाल्यानंतरही पुन्हा दोन कोटींची तरतूद :- नंदुरबार जिल्ह्य़ातील सारंगखेडा येथील चेतक ‘महोत्सवा‘वरील उधळपट्टीबाबत वित्त व नियोजन विभागाने आक्षेप घेतल्यानंतर याबाबतचा करार रद्द करणाऱ्या शासनाकडून डिसेंबरात होणाऱ्या या महोत्सवावर पुन्हा दोन कोटींची खैरात करण्यात आली आहे. राज्यातील कुठलाही महोत्सव वा यात्रा पुरस्कृत करण्याची तसदी न घेणाऱ्या शासनाकडून या महोत्सवावर खास मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. माजी मंत्र्यांचा जवळचा नातेवाईक अध्यक्ष असलेल्या समितीकडून या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

सारंगखेडा चेतक महोत्सवाबाबत खासगी कंपनीसोबत केलेला दहा वर्षांचा करार रद्द करावा आणि यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचा सहभाग निश्चित करून कारवाई करावी, अशी शिफारस वित्त व नियोजन विभागाने केली होती.

त्यानुसार हा करार रद्द करण्याची कारवाई करणाऱ्या  शासनाने या महोत्सवाला दोन कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय जारी केला आहे. याबाबतचे पहिले पत्र पर्यटन विभागाने १९ नोव्हेंबर रोजी दुसरे पत्र २७ नोव्हेंबर रोजी जारी केले. या प्रस्तावाला मुख्य सचिवांकडून मंजुरी मिळाल्यानंतर  हे पत्र पाठविण्यात आल्याचे अवर सचिव र. ज. कदम यांनी सांगितले.

२०१५-१६ पर्यंत स्थानिक पातळीवर होणाऱ्या ‘सारंगखेडा चेतक महोत्सवा‘वर पर्यटनमंत्री झाल्यावर  जयकुमार रावळ यांच्या काळात म्हणजे २०१६-१७ मध्ये एक कोटी ५५ लाख तर २०१७-१८ मध्ये सव्वाचार कोटी खर्च करण्यात आले. अहमदाबाद येथील लल्लूजी अँड सन्स या कंपनीशी  २०२६-२७ पर्यंत १० वर्षांचा परस्पर करार करून ७५ कोटी रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. केंद्र शासनाच्या ‘व्यवहार्यता तफावत निधी’नुसार तरतूद करण्यासाठी नस्ती नियोजन व वित्त विभागाकडे पाठविण्यात आली. त्यास या दोन्ही विभागांनी जोरदार आक्षेप घेत करार रद्द करण्याची शिफारस केली.

या शिफारशीनुसार हा करार रद्द करण्यात आला. त्यानंतरही या महोत्सवासाठी दोन कोटींची आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांनी सांगितले की, नागपूरमधील ऑरेंज सिटी महोत्सव किंवा एलिफंटा, अजंता उत्सव ज्या प्रमाणे पुरस्कृत केले जातात, त्याच धर्तीवर  सारंगखेडाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या जानेवारीत झालेल्या या महोत्सवाच्या देयकापोटी सहा कोटी ४२ लाख रकमेपैकी तीन कोटी २२ लाख रुपये देण्याचे आदेश १८ व २२ एप्रिल रोजी जारी करण्यात आले. वित्त विभागाच्या अधीन राहून ही रक्कम अदा करावी, असे या आदेशात नमूद होते. वित्त विभागाने जोरदार आक्षेप घेतल्यामुळे उर्वरित देयक अद्याप अदा झालेले नाही.

सारंगखेडा महोत्सवासाठी दोन कोटी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे पत्र जारी करण्यात आले असले तरी ती फक्त तरतूद आहे. या महोत्सवाला प्रत्यक्ष निधी देण्यात आलेला नाही – अजोय मेहता, मुख्य सचिव