विधिच्या विद्यार्थ्यांला उत्तरपत्रिकेचे चुकीचे छायापत्र

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराचे अजब नमुने अद्यापही समोर येत आहेत. निकाल वेळेवर जाहीर केल्याचा आनंद परीक्षा विभागात असताना आता निकालातील चुका आणि नवनवे गोंधळ समोर येऊ लागले आहेत. विधि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांला त्याने न लिहिलेल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्यात आली आहे. मात्र विशेष म्हणजे या उत्तरपत्रिकेवर त्या विद्यार्थ्यांचाच परीक्षा क्रमांक आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे घोळ या निकालातही सुरूच असल्याचे दिसत आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल तुलनेने लवकर लावल्यामुळे परीक्षा विभागाची गाडी रुळावर आली असे वाटत असतानाच आता निकालातील चुका समोर येत आहेत. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागितल्यानंतर विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक असलेली मात्र त्याने न लिहिलेल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्याची करामत परीक्षा विभागाने केली आहे.

विधि पदव्युत्तर (एलएलएम) अभ्यासक्रमाची जानेवारीमध्ये पहिल्या सत्राची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्यांस सर्व विषयांमध्ये चांगले गुण असताना एकाच विषयात २२ गुण मिळाले.

अनुत्तीर्ण झाल्याचा निकाल आल्यामुळे या विद्यार्थ्यांने अनुत्तीर्ण झालेल्या ‘इंडियन कॉन्स्टिटय़ूशन – लॉ अ‍ॅड न्यू चॅलेंजेस’ या विषयाची उत्तरपत्रिका मागितली. विद्यापीठाने वेळकाढूपणा करत अखेर विद्यार्थ्यांला उत्तरपत्रिकेची छायाप्रत उपलब्ध करून दिली.

मात्र परीक्षा विभागाने त्याचा क्रमांक असलेली मात्र दुसऱ्याच कुणी लिहिलेली उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांला दिली. या विद्यार्थ्यांने मराठी माध्यमात उत्तरपत्रिका लिहिली होती. मात्र त्याला मिळालेली उत्तरपत्रिका ही इंग्रजीत लिहिलेली आहे. मात्र, या उत्तरपत्रिकेवर परीक्षा क्रमांक त्याचाच आहे.

याबाबत परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाळे  यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक चुकीचे लिहिले असल्याचे अनेक प्रकार आढळून आले आहेत. कदाचित कुणी विद्यार्थ्यांने चुकीचा आसन क्रमांक लिहिला असेल. विद्यार्थ्यांने परीक्षा विभागात उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर शहानिशा करून त्याला योग्य उत्तरपत्रिका देण्यात येईल.’

-विनोद माळाळे, उपकुलसचिव, परीक्षा विभाग