शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नसते, त्यांना कीक मारूनच सत्तेतून बाहेर काढावं लागेल असा घणाघाती प्रहार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केला. तसंच शिवसेनेला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचलं गेलं पाहिजे. शिवसेनेसारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही असंही मत नारायण राणेंनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढेल असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

यानंतर नारायण राणे यांना केंद्रात काय होईल म्हणजेच लोकसभा निवडणूक झाल्यावर पुन्हा मोदी सत्तेत येतील का असे विचारण्यात आले. त्यावर 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपाला 200 जागा मिळतील असा अंदाज नारायण राणेंनी व्यक्त केला. सरकार बहुमतात येईल की नाही हे सांगता येत नाही मात्र 200 जागा भाजपाला मिळू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवला. यावेळी त्यांना नीलेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दलही विचारण्यात आले. ज्यानंतर नारायण राणे म्हटले, माझ्या मुलाने ज्या भाषेत उत्तर दिले ते चुकीचं नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणे साहजिकच आहे. शेवटी तो राणेंचा मुलगा आहे असं म्हणत नारायण राणेंनी नीलेश राणेंची पाठराखण केली.

नारायण राणे यांना सगळ्याच पक्षाकडून मागणी आहे, लवकरच एकाच पक्षात तिन्ही राणे दिसतील असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे सिनेमाबद्दल विचारले असता तो आपण घरीच पहाणार असल्याचेही स्पष्ट केले. माझ्या घरीच थिएटर आहे त्यामुळे मी तो घरीच पहाणार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे.