मूल्यांकनासाठी वेळ नसल्याने प्राध्यापकांची धावपळ

हिवाळी सत्र परीक्षेच्या नियोजनशून्यतेमुळे प्रथम आणि द्वितीय परीक्षांचे लांबलेले मूल्यांकनाचे काम, दुसऱ्या सत्राचे वर्ग घेण्याची जबाबदारी आणि महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन अशा कात्रीत सापडलेल्या प्राध्यापकांना तृतीय वर्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कामाकरिता दिवसभरात पुरेसा वेळ देणे कठीण होत आहे. त्यामुळे मागील सत्राप्रमाणे तृतीय वर्षांचे निकाल याही सत्रात लांबण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा यंदा विद्यापीठाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार होत आहेत. या नियोजनामध्ये विद्यापीठाने घोळ घातल्याने गरज नसताना प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा एकत्रितपणे सुरू झाल्या. त्यामुळे तिन्ही परीक्षांचे मूल्यांकन एकाच वेळेस प्राध्यापकांना करावे लागत आहे. परिणामी, मूल्यांकनाचे गणित यंदा बिघडले आहे.

पदवीच्या तृतीय वर्षांच्या परीक्षा ९ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. यापैकी काही परीक्षा २ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहेत. यातील काही परीक्षा संपून आठवडाभराचा कालावधी लोटला तरी काही उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांवर (कॅप) मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. काही महाविद्यालयांतील प्राध्यापकांना अद्याप मूल्यांकनासाठीचे संदेशदेखील आलेले नाहीत. तर ज्या महाविद्यालयांमध्ये मूल्यांकनाचे काम सुरू आहे, तिथे बहुतांश प्राध्यापक प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनामध्ये व्यस्त आहेत. ते डिसेंबर महिन्यातही जोर पकडण्याची शक्यता नाही. कारण, तेव्हा दुसऱ्या सत्रातील वर्ग आणि महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्दळ यामुळे प्राध्यापकांना मूल्यांकनाच्या कामाला वेळ देणे शक्य नाही. द्वितीय वर्षांच्या परीक्षा दिवाळी सुट्टीच्या आधी विद्यापीठाने घेतल्या असत्या तर सुट्टीमध्ये त्या परीक्षेच्या मूल्यांकनाचे काम आटोपले असते. दरवेळेस परीक्षा सुरू झाल्यानंतर साधारणपणे चौथ्या वा पाचव्या दिवसापासून मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात होते. परंतु यंदा तिन्ही वर्षांच्या परीक्षा एकाच कालावधीत असल्याने प्राध्यापक दिवसभर पर्यवेक्षणाच्या कामात अडकून राहिले आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत परीक्षाच सुरू आहेत. त्यात आता प्राध्यापक प्रथम आणि द्वितीय परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत. परीक्षा संपल्यानंतरच तृतीय वर्षांच्या मूल्यांकन सुरु होईल, असे दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सांगितले.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे दडपण

लांबलेल्या परीक्षांमुळे दुसरे सत्र सुरू होऊन महिना उलटला तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू  झालेले नाहीत. त्यामुळे आता अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे दडपण प्राध्यापकावर आहे. वर्ग घ्यावे लागणार असल्याने मूल्यांकनासाठी दिवसभरात दोन किंवा तीन तास देणेच शक्य नाही. तसेच परीक्षा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारीही प्राध्यापकांवरच आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी एकाच वेळेस आल्याने मूल्यांकनाच्या कामावर थोडाफार परिणाम होणार आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी दिली.