नववीच्या विषयवार उत्तीर्ण-अनुत्तीर्णाची माहिती देण्याचे आदेश

दहावीला १०० किंवा नव्वद टक्क्य़ांपार निकालाची परंपरा जपण्याच्या हव्यासापोटी नववीला मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा गैरप्रकार नववीच्या निकालाच्या आकडेवारीवरून समोर आल्यानंतर आता दहावीचा निकाल कृत्रिमरीत्या फुगविणाऱ्या शाळांच्या मागे शालेय शिक्षण विभागाने हात धुऊन लागायचे ठरविले आहे. दहावीचा निकाल फुगविण्यासाठी नववीतच जाणूनबुजून कडक धोरण अवलंबणाऱ्या मुंबईतील शाळांना तर हा प्रकार चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईपाठोपाठ उत्तर व पश्चिम विभागांतील निरीक्षकांनीही आपापल्या अखत्यारीतील शाळांचे नववी-दहावीचे निकाल मागवून त्यांची तुलना केली. त्यात सर्व विभागाच्या मिळून ११५ शाळांमध्ये २८२९९ विद्यार्थी नववीला अनुत्तीर्ण झाल्याचे आढळून आले. आता या शाळांकडून नववीला विषयनिहाय किती मुले नापास झाली याचीही माहिती मागविण्यात येत आहे.

शाळांनी दहावीचा निकाल कृत्रिमरीत्या फुगविण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर मेहनत घ्यावी, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शाळेतील अप्रगत विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्याकरिता शाळा करत असलेल्या उपायांची माहितीही मागविण्यात येत आहे.

पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक बी. डी. पुरी यांनी २०१५-१६ मध्ये शाळेतील नववीतील जे विद्यार्थी ज्या ज्या विषयात अप्रगत आहेत त्यांची आकडेवारी मागविली आहे. त्या त्या विषय शिक्षकांशी चर्चा करून अप्रगत विद्यार्थ्यांकरिता उपचारात्मक शिक्षण घेण्याबाबत शाळांनी काय केले याचीही माहिती शाळांना द्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर नापासांचे प्रमाण अधिक आढळून आल्यास संबंधित विषयाचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Chart-School