पालघरमधील तारापूर एमआयडीसीतील तीन कंपन्यांना भीषण आग लागली असून यात कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही आग धुमसत असून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

तारापूर एमआयडीसीतील मोहिनी केमिकल कंपनीला सुरुवातीला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने ही आग आजूबाजूला पसरत गेली. त्यामुळे या कंपनीच्या बाजूच्या मीनार आणि भारत आईस या कंपन्यांमध्येही आग पसरली. आगीमुळे तीनही कंपन्यांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सुत्रांकडून कळते. या घटनेबाबत अधिक माहिती कळू शकलेली नाही.

गेल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका रहिवासी इमारतीला आग लागली होती. या इमारतीतून दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीजवळील दोन पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर गेल्या महिन्यांत भिवंडी एमआयडीसीतील दोन टेक्स्टाईल कंपन्यांना आग लागली होती. कपड्याची कंपनी असल्याने मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे नुकसान झाले होते.