मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गातील सर्वात अवघड टप्पा समजले जाणारे मिठी नदीखालील भुयारीकरण बुधवारी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुल ते धारावी या मिठी नदीखालून जाणाऱ्या अप व डाऊन मार्गिकेसाठी एकूण तीन किमीचे भुयारीकरण करण्यात आले आहे.

गोदावरी ३ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) या वर्षी मार्चमध्ये डाऊन मार्गिकेचे भुयारीकरण पूर्ण केले, तर गोदावरी ४ हे टीबीएम बुधवारी धारावी स्थानकात भुयारीकरण पूर्ण करून बाहेर आले. गोदावरी ४ या टीबीएमने वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकातील विवरातून (लाँचिंग शाफ्ट) २१ ऑगस्ट २०१९ ला भुयारीकरणास सुरुवात केली.  त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील धारावी ते सांताक्रूझ या पाचव्या टप्प्यातील संपूर्ण भुयारीकरणदेखील झाले आहे.

दोन्ही मार्गिकांवरील एकूण ४८४ मीटर भुयारीकरण हे प्रत्यक्ष मिठी नदीच्या पात्राखाली करण्यात आले. नदीपात्राचा भाग सोडल्यास उर्वरित भाग हा कांदळवन आणि दलदलीचा असल्याने त्याखालील भुयारीकरणाचा टप्पादेखील आव्हानात्मक होता. ‘मुंबईतील गुंतागुंतीची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याची उच्च पातळीशिवाय कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या मर्यादा यामुळे हे काम अधिकच कठीण होते,’ असे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

विशेष तंत्राचा वापर

देशातील नदीखालील भुयारीकरणाचा हा दुसरा प्रकल्प आहे. याकरिता टीबीएमच्या जोडीने अर्थ प्रेशर बॅलन्सिंग तंत्र वापरण्यात आले. टीबीएमच्या साहाय्याने हवा तेवढा भाग खोदताना चहूबाजूंनी येणाऱ्या दाबानुसार खोदकामाचा वेग नियंत्रित केला जातो. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल ते विद्यानगरी या टप्प्यात मिठी नदी शेजारून वाहत असल्यामुळे तेथेदेखील हेच तंत्र वापरले जात आहे. भुयारामध्ये पाणी शिरू नये यासाठी अनेक प्रकारची दक्षता घेण्यात आली आहे. भुयाराच्या सेगमेन्ट रिंग्जमध्ये गॅसकेटचा ‘हायड्रोफिलिक’ घटकाचा वापर केला, जेणेकरून पाणी शिरलेच तरी हा घटक प्रसरण पावून पाण्याला अवरोध केला जाईल.

६.२ मीटर भुयाराचा व्यास

२०-२४ मीटर मिठी नदीपात्राच्या पृष्ठभागापासून ते भुयाराच्या तळापर्यंतचे अंतर

१४ मीटर मिठी नदीपात्राच्या पृष्ठभागापासून ते भुयाराच्या वरील बाह्य़ भागापर्यंतचे अंतर

९ मीटर मिठी नदीच्या तळापासून ते मेट्रो भुयाराच्या वरच्या टप्प्यापर्यंतचे अंतर