एकाच दुकानात नूडल्स, चाकलेट्स, बिस्किट्स तसेच चिप्ससारख्या लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खाद्यपदार्थांबरोबर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्याला बंदी घालण्यात आली आहे. बुधवारी राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.  द टेलिग्राफने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

जे खाद्यपदार्थ लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. अशा खाद्यपदार्थांबरोबर तंबाखू, पान, सुपारीसारखे पदार्थ विक्रीसाठी ठेवणे यापुढे दुकानदारांना महागात पडणार आहे. कारण किशोरवयीन मुलांमध्ये अशा तंबाखूजन्य पदार्थ दृष्टीस पडल्याने त्याचे आकर्षण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाबाबत माहिती देताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले की, चाकलेट किंवा चिप्स सारखे खाद्यपदार्थ दुकानातून आणायला गेल्यानंतर लहान मुलांना तिथे उपलब्ध असलेल्या इतर खाद्यपदार्थांचे आकर्षण असते. त्यामुळे अशा दुकानात त्यांना तंबाखूजन्य पदार्थ दिसल्यास ते त्याकडेही आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सुंगधी सुपारीच्या विक्रीवरही सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. जुलै २०१८पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. त्याचबरोबर या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीसाठी राज्यभरात प्रचार मोहिम राबवण्यात येणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.

दुकांनांमध्ये जलदरित्या विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आणण्याबाबत केंद्र सरकारने राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित होण्यापासून प्रतिबंध व्हावा यासाठी ९ जानेवारी रोजी नोटिफिकेशन काढण्यात आले असल्याचे दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.