मुंबई एन्ट्री पॉईंट आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील टोलबंद करण्याबाबत उपायोजना सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून अप्पर मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षेखालील समितीस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर टोलबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी दिली.
संजय दत्त व अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देतांना शिंदे यांनी हा माहिती दिली. मुंबई एन्ट्री पॉईंट आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या दोन्ही प्रकल्पांची वित्तीय तसेच कायदेशीर व्यवहार्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने जून २०१५मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. प्रारंभी या समितीला दोन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. मात्र तीन वेळा मुदतवाढ देऊनही ३१ डिसेंबर पर्यंत अहवाल सादर होऊ शकला नाही.