घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी

मुंबई : दक्षिण मुंबईतील एस.व्ही.पी. रोडवर  आढळलेल्या व्यक्तीचा  बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालावरून उघड झाले आहे. या व्यक्तीचा नेमका कसा मृत्यू झाला याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. दक्षिण मुंबईतील  दुकान बंद करून अब्दुल करीममिया अहमद महाबळेश्वरवाला (४२) सायंकाळी ७च्या सुमारास डोंगरी येथील घराच्या दिशेने निघाले होते. वाटेत असताना त्यांनी मोबाइलवरून घरी संपर्कही साधला होता. मात्र रात्र झाली तरीही ते घरी परतले नाहीत. यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते.

रात्रभर वाट पाहिल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पत्नी घराबाहेर पडली. डोंगरी येथून त्या चालतच निघाल्या. एस. व्ही. पी. रोडवर खेतवाडीजवळ  एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली त्यांना दिसली. ती व्यक्ती आपला पती असल्याचे त्यांनी ओळखले.

पोलिसांनी मृतदेह जेजे रुग्णालयात पाठवून दिला. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार अब्दुल यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे उघड झाले. अब्दुल यांची आई कर्करोगाने आजारी आहे, तर वडील अंध आहेत. दोन मुले आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे. अब्दुल यांच्या मृत्यूबाबत डोंगरी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, अब्दुल यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र ते पाण्यात कसे बुडाले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असून हे पथक चित्रण तपासत असल्याची माहिती व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची मागणी

महाबळेश्वरवाला यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून १० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी केली आहे.