पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले असून या मार्गावरील प्रवास त्यांच्यासाठी दिव्य झाले आहे. बुधवारी रात्रीही पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक मंदावलेली होती.

खेरवाडी ते अंधेरी, विलेपार्ले ते दिंडोशी, मालाड ते कांदिवली या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दक्षिण मुंबईतून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गावर प्रवासासाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत होता.

गेले काही दिवस या मार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. बुधवारी झालेल्या कोंडीमुळे या त्रासात आणखी भर पडली.