मुंबई : वाहिन्यांसाठीचे नवे दरपत्रक लागू करण्याचा इशारा दूरसंचार नियमन प्राधिकरणाने (ट्राय) दिल्यावर त्याविरोधात प्रक्षेपकांनी (ब्रॉडकास्टर्स) पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नवे दरपत्रक २०१७ मध्ये जारी करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यात सुधारित दरपत्रक जारी केले गेले. मात्र अद्याप या सुधारित दरपत्रकाची अंमलबजावणी प्रेक्षपकांनी केलेली नाही. त्यामुळे सुधारित दरपत्रकानुसार वाहिन्यांचे नवे दर सादर करण्याचा करण्याचा इशारा ट्रायने गेल्या महिन्यात प्रक्षेपकांना दिला होता. त्याला प्रक्षेपकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून याचिका प्रलंबित असेपर्यंत सुधारित दरपत्रक लागू करण्यास स्थगितीची मागणी केली आहे.

न्यायमूर्ती सुरेश गुप्ते आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर प्रक्षेपकांच्या याचिकांवर सुनावणी झाली. त्या वेळी सुधारित दरपत्रकाबाबतच्या तरतुदीला प्रक्षेपकांनी आधीच आव्हान दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.