आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोलमडली. मध्य रेल्वेवर आटगाव आणि आसनगाव दरम्यान लोकलच्या एका डब्यात बिघाड झाला. तर मशीद आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. परिणामी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
मध्य रेल्वेवर कसाऱ्याहून सकाळी ७.१८ ला मुंबईच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या एका डब्यात आटगाव आणि आसनगाव या स्थानकांदरम्यान बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी जागच्या जागी थांबून राहिली. प्रवाशांना रेल्वेरुळांवर उतरून जवळचे स्थानक गाठावे लागले. या बिघाडामुळे ही लोकल दोन तास जागीच खोळंबून राहिली. त्यामुळे कसारा व आसनगाव दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली. या बिघाडामुळे लोकलमागे असलेल्या पंचवटी, राज्यराणी, ८.२० वाजता कसाऱ्याहून सुटणारी लोकल, दुरांतो एक्स्प्रेस अशा गाडय़ा अडकून राहिल्या. अखेर डाऊन मार्गावरून इंजिन नेऊन ते लोकलला जोडून ही लोकल वासिंद रेल्वे स्थानकावर नेण्यात आली. अखेर ११.३० वाजता ही लोकल दुरुस्त करून रवाना करण्यात आली. मात्र यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
हार्बर मार्गावर मशीद आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान ओव्हरहेड वायरमधील इन्सुलेटर तुटला. सकाळी ११च्या सुमारास झालेला हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक कालावधी लागला. या दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक जागीच थांबली होती. परिणामी प्रवाशांना पायपीट करावी लागली. अखेर अध्र्या तासानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून हार्बर मार्गावरील वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र एकाच प्लॅटफॉर्मवरून वाहतूक होत असल्याने त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला. दुपारी एकनंतर सेवा पूर्ववत झाली, तरी हार्बर मार्गावरील तब्बल ५८ सेवा यामुळे रद्द करण्यात आल्या.