ट्रामच्या रूळांखेरीज अनेक ऐतिहासिक गोष्टी मुंबईच्या रस्त्यांखाली;
ब्रिटिशकालीन मुंबईचा इतिहास सांभाळण्याची गरज
फोर्ट परिसरातील रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याखाली गाडले गेलेले ट्रामचे रूळ पुन्हा दिसायला लागले आणि एके काळी या ट्रामने प्रवास केल्याच्या आठवणी असलेल्या जुन्या मुंबईकरांना गलबलून आले. मात्र, मुंबईच्या अनेक रस्त्यांखाली ब्रिटिशकालीन मुंबईतील अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत. काही ठिकाणी तर या खुणा कोणाच्याही खिजगणतीत नसून नुसत्याच रस्त्याच्या अथवा रेल्वे स्थानकाच्या बाजूला पडून आहेत. या सर्वच गोष्टींच्या माध्यमातून मुंबईतील ऐतिहासिक ठेवा सांभाळून ठेवण्याची गरज मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार करत आहेत.
ब्रिटिशकालीन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत पसरलेल्या या ट्रामच्या जाळ्यापकी चार रूळ नुकतेच हुतात्मा स्मारक परिसरात रस्त्याचे काम चालू असताना सापडले. मात्र मुंबईतील ट्रामचे जाळे लक्षात घेता असे रूळ अनेक ठिकाणी आढळू शकतात. यात ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर (आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस), जे. जे. रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक ठिकाणांचा समावेश आहे. येथील रस्त्यांवर खणल्यास तेथेही असे रूळ आढळू शकतात.

PHOTO: खोदकामात सापडला ५० वर्षांपूर्वीचा ट्राम रेल्वेचा ट्रॅक

त्याशिवाय रेल्वे रुळांच्या खालीही अनेक गमतीदार गोष्टी असल्याचे ‘हॉल्ट स्टेशन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक आणि जुन्या मुंबईचे अभ्यासक राजेंद्र आकलेकर यांनी सांगितले. सध्या असलेल्या भांडुप स्थानकाच्या ठिकाणी २२ कमानी असलेला एक पूल होता. अजूनही हा पूल तसाच अस्तित्वात असून पाचव्या-सहाव्या माíगकेचे काम चालू असताना तो दिसला होता, असेही आकलेकर यांनी स्पष्ट केले. २००५ मध्ये लालबाग येथील उड्डाणपुलाचे काम करताना तेथेही ट्रामचे रूळ सापडले होते. त्याचप्रमाणे मशीद स्थानकाजवळ तीन तोफा ठेवलेल्या होत्या. त्यापकी एका तोफेचे मंदिर बनवण्यात आले असून मशीद स्थानकाकडून कारनॅक पुलाकडे जाताना हे मंदिर अजूनही दिसते, तर उर्वरित दोन तोफा अशाच पडून आहेत. शिवडी स्थानकाबाहेरही अशाच तोफा पडल्या आहेत.

मोनोरेलच्या बांधकामाच्या वेळी परळ भागातील अशीच एक ऐतिहासिक खूण कायमची पुसली गेल्याची खंतही आकलेकर यांनी व्यक्त केली. या भागात एक जुनी पाणपोई होती. ही पाणपोई वाचवण्यासाठी मुंबईतील इतिहासप्रेमींनी खूप संघर्ष केला होता, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्याचप्रमाणे मुंबईचे अंतर दाखवून देणारे मैलाचे दगड आजही असेच दुर्लक्षित पडून आहेत. मुंबई किती पसरली आहे, हे मोजण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात फोर्ट परिसरातील सेंट कॅथ्रेडल (एशियाटिक सोसायटीसमोरील चर्च) हा शून्य िबदू घेऊन मलाचे दगड उभारण्यात आले होते. मुंबईभर एकूण १६ मलांचे दगड होते. आजही ते अस्तित्वात आहेत. त्यापकी सायन-चुनाभट्टी येथे असलेल्या मलाच्या दगडावर ‘८ माइल्स फ्रॉम सेंट कॅथ्रेडल’ असे लिहिलेले आठवते. असे मलाचे दगड करीरोड, दादर येथील मारुतीचे गोल मंदिर येथेही दिसतात.
या सर्व ऐतिहासिक गोष्टी मुंबईकरांनी, महापालिकेने आणि राज्य सरकारनेही जपायला हव्यात. मुंबईच्या वैभवशाली इतिहासाच्या या खुणा असून त्यांचे जतन करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्थाही पुढे येतील. केवळ ट्रामचे रूळ सापडले म्हणून इतिहासप्रेमाचे भरते येऊन उपयोग नाही. ट्रामच्या रुळांबरोबरच अनेक गोष्टी आज मुंबईचे गतवैभव दाखवून देत आहेत. त्यांचीही जपणूक केली पाहिजे, असेही आकलेकर यांनी सांगितले.

ट्रामचे रूळ बेस्टच्या संग्रहालयात
फोर्ट परिसरात सापडलेले ट्रामचे रूळ हे बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बीईएसटीच्या मालकीचे आहेत. त्यामुळे हे चारही रूळ व्यवस्थित उखडून ते आणिक आगार येथील बेस्टच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.