मुंबई सेंट्रल, वांद्रे, टिळक टर्मिनस, बोरिवली, ठाणे स्थानकांचा कायापालट

रेल्वे अर्थसंकल्पाचे विलीनीकरण झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय काय मिळाले आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे असले, तरी मुंबईतील पाच स्थानकांचा पुनर्विकास होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरातील एकूण २५ स्थानकांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात झाली असून त्यात मुंबईतील या पाच स्थानकांचा समावेश आहे. दोन आठवडय़ांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असून लवकरच ही स्थानके कात टाकणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वेबाबत घोषणा करताना १.३१ लाख कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख केला, पण सर्वसाधारण अर्थसंकल्पातील एक छोटा भाग असलेल्या रेल्वेच्या प्रकल्पांबाबत त्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातून मुंबईकर प्रवाशांसाठी काय, याचे उत्तर मिळालेले नाही. तरीही देशभरातील २५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची घोषणा जेटली यांनी केली. या स्थानकांमध्ये मुंबईतील पाच स्थानकांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे या दोन स्थानकांच्या पुनर्विकासाचा आराखडा आठवडाभरात संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांमध्ये ही कामे होणार आहेत. या कामांच्या पुनर्विकासाच्या कामाचा आराखडाही आठवडाभरात संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य

  • मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा आणि स्वच्छता या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
  • सुरक्षेच्या दृष्टीने देखभाल दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे.
  • मध्य रेल्वेने नऊ स्थानकांची स्वच्छता करण्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. यात आणखी दहा स्थानकांची भर पडणार आहे.
  • मध्य व पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये बायो-टॉयलेट बसवण्याचे काम दोन वर्षांपूर्वीच सुरू झाले असून लवकरच सर्व डब्यांमध्ये बायो-टॉयलेट्सचा समावेश असेल.
  • सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवर १७ गाडय़ांमधील महिलांच्या ५० डब्यांपैकी २४ डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
  • मार्च अखेरीपर्यंत सर्व ५० डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवले जातील.

पुनर्विकास करताना प्रत्येक स्थानकात काय काय कामे करायची आहेत, याचा आढावा घेण्यात येणार आहे. स्थानकाचा कायापालट करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी, प्लॅटफॉर्मची उंची, प्रसाधनगृहे, अनारक्षित तिकीट केंद्रे, या सर्वच गोष्टी बदलणार असून अद्ययावत सोयीसुविधा स्थानकात दिल्या जाणार आहेत. त्यासाठी १०० कोटी रुपयांपासून कितीही खर्च होऊ शकतो.

–  डी. के. शर्मामध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक