माथेरानच्या मिनी ट्रेनला लवकरच एक वातानुकूलित डबा जोडण्यात येणार असतानाच आता व्हिस्टाडोम (पारदर्शक) डबाही जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षांत म्हणजेच २०१९ मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यातच ही सुविधा पर्यटकांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने ठेवले आहे.

प्रवाशांना आणि पर्यटकांना कोकणातील निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला सप्टेंबर २०१७ मध्ये पारदर्शक डबा जोडण्यात आला. काचेच्या मोठय़ा खिडक्या, उत्तम आसनव्यवस्था, १२ एलसीडी, एक फ्रिज, एक ओव्हन, प्रवाशांच्या सामानासाठी जागा अशा काही सुविधा यामध्ये देण्यात आल्या. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देण्यात आला. आता अशाच प्रकारचा छोटा डबा माथेरानच्या मिनी ट्रेनलाही जोडण्यात येणार आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मिनी ट्रेनचे आकर्षण आहे. मधल्या काळात ही गाडी सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. काही उपाययोजना केल्यानंतर सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे पुन्हा प्रवाशांचा ओघ वाढू लागला. प्रवाशांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळावा आणि प्रवाशांच्या दृष्टीने काही बदल करण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार १६ आसनी असलेला एक वातानुकूलित डबाही लवकरच जोडला जाणार आहे. त्यापाठोपाठ आता एक पारदर्शक (व्हिस्टाडोम) डबाही जोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. हा डबा २०१९ मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यातच जोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. तत्पूर्वी या डब्यासह मिनी ट्रेनची चाचणीही घेण्यात येईल. त्यानंतर हा डबा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.