24 February 2021

News Flash

पावसाळ्यात आतापर्यंत ४६३ झाडांची पडझड

फांद्या तोडण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून सरासरी ३० कोटी रुपये खर्च केले जातात.

संग्रहीत छायाचित्र

झाडांच्या शास्त्रशुद्ध छाटणीसाठी ९५ कोटी रुपयांचे कंत्राट

पावसाळ्याआधी ६० हजाराहून अधिक झाडांची शास्त्रीयदृष्टय़ा छाटणी केल्याचा दावा महानगरपालिकेने केला असला तरी गेल्या महिन्याभरात शहरातील ४६३ झाडे पडली असून ७९६ झाडांच्या मोठय़ा फांद्या तुटल्याची माहिती पालिकेकडे जमा आहे. ही माहिती मंगळवापर्यंतची असून गेल्या पाच दिवसातील पावसामुळे ही संख्या वाढली असण्याची शक्यता आहे. या झाडांमध्ये खासगी परिसरातील झाडे पडण्याची संख्या जास्त असून या झाडांच्या छाटणीची जबाबदारीही पालिकेवरच आहे. महत्त्वाचे म्हणजे झाडांची छाटणी करण्यासाठी पालिकेने गेल्यावर्षी ३ वर्षांसाठी ९५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यास मान्यता दिली.

खासगी परिसरातील झाडे वाचवण्यासाठी, त्यांची शास्त्रीयदृष्टय़ा छाटणी करण्याच्या उद्देशाने २०१३ पासून महानगरपालिकेने शहर परिसरातील सर्व झाडांची जबाबदारी घेतली. मात्र पालिकेच्या विभाग कार्यालयांकडे वारंवार विनंती करूनही झाडे छाटण्यासाठी तसेच तोडण्यासाठी पालिकेकडून परवानगी मिळत नसल्याचा अनुभव रहिवाशांना येतो तर आवश्यकता नसतानाही मोठे लाकूड मिळवण्यासाठी झाडाच्या बुंध्यापर्यंत फांद्या छाटण्याचा दुसऱ्या टोकाचा अनुभवही आहे, असे वृक्षअभ्यासक डॉ. विद्याधर ओगले म्हणाले.

महापालिकेने शास्त्रीयदृष्टय़ा वृक्षछाटणी करूनही एक जूनपासून १८ जुलैपर्यंत महापालिकेच्या जागेवरील १५५ झाडे पडली असून खासगी परिसरातील तब्बल ३०८ झाडे पडली आहे.  त्याचप्रमाणे पालिकेच्या जागेवरील ३२० झाडांच्या मोठय़ा फांद्या पडल्या असून खासगी परिसरातील ४७६ झाडांच्या मोठय़ा फांद्या पडल्या आहेत. या फांद्या तोडण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून सरासरी ३० कोटी रुपये खर्च केले जातात.

गेल्या वर्षी मे महिन्यात पालिका प्रशासनाकडून ३ वर्षांसाठी ९५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव आला. हा प्रस्ताव एका वर्षांसाठीच असावा असे सांगत आम्ही तो परत पाठवला. मात्र पावसाळा तोंडावर आला असल्याची भीती दाखवत तो मंजूर करून घेण्यात आला, अशी माहिती वृक्ष समितीचे माजी सदस्य निरंजन शेट्टी यांनी दिली.

मात्र एवढी रक्कम खर्च करूनही झाडे पडण्याची व फांद्या तुटून लोक जखमी होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या महिन्याभरात झाड पडून तीन जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

झाडांची शास्त्रीयदृष्टय़ा वृक्षछाटणी केली जाते हा पालिका अधिकाऱ्यांचा दावा या पावसाळ्यातील घटनांनी फोल ठरवला आहे. त्यांनी योग्य ती काळजी घेतली असती तर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वृक्षहानी झाली नसती व लोकांचा जीवही वाचला असता, असे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले.

महापालिकेचा अहवाल निरंक

रस्त्यांवर पडलेले खड्डे, पाणी तुंबलेली ठिकाणे यांची कोणतीही माहिती उघड करण्यास स्वारस्य नसलेल्या महापालिकेकडे या घटनेचीही माहिती नव्हती. महापालिकेकडून दररोज पावसाळ्यातील घटनांचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यात घर पडणे, दरड कोसळणे, शॉर्टसर्किट, झाड पडणे, वाहतूक व्यवस्था व विशेष माहितीचा अंतर्भाव असतो. या अहवालात पावसामुळे शहरातील किती भागांत पाणी तुंबले त्याचीही माहिती पूर्वी असे. मात्र त्यावरून पालिकेची ‘बदनामी’ होत असल्याचे लक्षात आल्यावर या पावसाळ्यात पालिकेने ‘निरंक’ या शब्दाची मदत घेऊन माहिती देणे टाळले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:37 am

Web Title: tree falling issue in monsoon bmc
Next Stories
1 अकरावीच्या ‘कटऑफ’चे गणित बदलले
2 साहसी खेळांसाठी सर्वसमावेशक धोरण आखा
3 ‘इंदू सरकार’चा वाद उच्च न्यायालयात
Just Now!
X