मोबाइल अ‍ॅपवर सुविधा; विभाग कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन

करोनामुळे विभाग कार्यालयात जाऊन वृक्ष छाटणीची परवानगी घेणे सोसायटय़ा, खासगी जागांच्या मालकांना शक्य होत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने पालिकेच्या मोबाइल अ‍ॅपवर (MCGM 24×7) वृक्ष छाटणीच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना घरबसल्या सोसायटीतील वृक्षांच्या छाटणीची परवानगी मिळू शकेल.

दरवर्षी पावसाळ्यात वृक्षांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मात्र गृहनिर्माण सोसायटय़ा, खासगी जागेतील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी संबंधित मालकांना करावी लागते. मृत झालेले वा कीड लागलेले धोकादायक वृक्ष पावसाळ्यात उन्मळून पडून अपघात होण्याची शक्यता असते.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता मृत वा कीड लागलेल्या धोकादायक वृक्षांबाबत नागरी सेवा सुविधाविषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. या संदर्भात अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान खात्याची एक विशेष बैठक नुकतीच पार पडली. अश्विनी भिडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे आवाहन करण्यात आले.

झाडांची छाटणी, मृत व धोकादायक झाडांची विल्हेवाट पालिकेच्या कंत्राटदारामार्फत

केली जाते. मात्र त्यासाठी संबंधितांना पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. आवश्यक शुल्क भरल्यानंतर सात दिवसात वृक्ष छाटणीची प्रक्रिया केली जाते. मात्र विभाग कार्यालयात जाऊन अर्ज करणे सध्याच्या स्थितीत ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी पालिकेने या मोबाईल अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध केली आहे.

* मुंबईत असलेली एकू ण झाडे : २९,७५,२८३

* खासगी आवारात असलेली झाडे : १५,६३,७०१

* शासकीय इमारतीच्या आवारातील झाडे : ११,२५,१८२

* रस्त्याकडेला असलेली झाडे : १,८५,३३३

* उद्यानांमधील झाडे : १,०१,०६७

(मुंबईमध्ये २०१८ मध्ये झालेल्या वृक्षगणनेनुसार)