आदिवासी विभागामार्फत घेतल्या जाणा-या क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या स्पर्धांप्रमाणे दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी घेतला.
आदिवासी क्षेत्रातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ मिळणार असून, आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार असल्याची माहितीही विनोद तावडे यांनी दिली.
आदिवासी खेळाडू हे आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मात्र, या स्पर्धांना क्रीडा संचालनालयाची मान्यता नसल्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या विजयी खेळाडूंना २५ वाढीव गुणांचा फायदा मिळत नव्हता, परंतु, यासंदर्भात तावडे यांच्याकडे अनेक लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांनी आदिवासी खेळाडूंना विविध सवलती मिळण्यासाठी विनंती केली होती. यासंदर्भात तावडे यांनी विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करुन आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय घेतला.