‘टीआरपी’ घोटाळ्यातील संशयितांनी चौकशी किंवा संभाव्य अटक टाळण्यासाठी मोबाइल, लॅपटॉपमधील गुन्ह्य़ाशी संबंधित विदा (डेटा) काढून ही उपकरणे मोकळी करण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी तर ही उपकरणेच फेकून दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वाहिन्यांचे ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ग्राहकांना फितविणाऱ्या, त्यांना पैसे पोच करणाऱ्या आणि वाहिन्या-ग्राहकांमधील दुवा असलेल्या आरोपींची साखळी गजाआड केली. त्यानंतर या साखळीला हाताळणाऱ्या किंवा आदेश देणाऱ्या संशयित वाहिन्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळविला.

रिपब्लिक वाहिन्यांची प्रवर्तक कंपनी ‘एआरजी आऊटलायर’चे सहायक उपाध्यक्ष आणि वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी, ब्रॉडकास्ट ऑडिअन्स रिसर्च काऊन्सिलचे (बार्क) मुख्य परिचलन अधिकारी (सीओओ) रोमिल रामगडिया यांना दुसऱ्या टप्प्यात अटक केली.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष चौकशीपेक्षा त्यांच्या मोबाइल, लॅपटॉप या उपकरणांमधून तपासाला दिशा, वेग देणारी उपयुक्त माहिती हाती आली. या उपकरणांमध्ये ‘टीआरपी’ वाढविण्याबाबत आरोपींनी आपापसात, वरिष्ठ किंवा मुख्य सूत्रधारांसोबत साधलेला संवाद, छायाचित्रे, तक्ते आदी माहिती होती. त्याआधारे तपासाची व्याप्ती वाढली. ही बाब लक्षात घेत न्यायालयातून दिलासा मिळवलेल्या बहुतांश संशयित, वॉण्टेड आरोपींनी आपापल्या उपकरणांमधून ‘टीआरपी’शी संबंधित, नेमकी माहिती किं वा तपशील डिलिट करण्यास सुरुवात केली.

ही बाब संशयित किंवा साक्षीदारांच्याच चौकशीतून लक्षात आल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला. ‘एआरजी’चे सहायक उपाध्यक्ष घनश्याम सिंग ‘टीआरपी’ घोटाळ्याबाबत कंपनीतील वरिष्ठांशी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सतत संवाद साधत होते. हे संभाषण त्यांच्या मोबाइल तपासणीतून हाती लागले. मात्र त्यांच्या वरिष्ठांपैकी काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यांचे मोबाईल तपासले तेव्हा त्यात हे संभाषण नव्हते. चौकशीला येण्याआधी त्यांनी ते संभाषण आणि संबंधित सर्व साहित्य काढून मोबाईल मोकळा के ल्याचे आढळले. तसेच काही जण रिकाम्या हाती म्हणजे मोबाइल घरी किं वा कार्यालयात ठेवून चौकशीला येऊ लागले.

एसआरजी आऊटलायरचे सीईओ खानचंदानी यांना चौकशीदरम्यान मोबाइलबाबत विचारले असता त्यांनी गहाळ झाला, असे उत्तर दिले. खानचंदानी यांनी पुरावे हाती लागू नये यासाठी हेतुपुरस्सर मोबाइल दडविला, असा संशय असून ही बाब न्यायालयाच्याही निदर्शनात आणून दिल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकारानंतर मोबाइल, लॅपटॉप आदी उपकरणांतून गहाळ डेटा हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बऱ्याच अंशी त्यात यश आले आहे. या माहितीस विशेष पथकाचे प्रमुख सचिन वाझे यांनी दुजोरा दिला.

रोमिल रामगडिया यांच्या कोठडीत वाढ

‘बार्क’चे मुख्य परिचलन अधिकारी (सीओओ) रोमिल रामगडिया यांची पोलीस कोठडी दंडाधिकारी न्यायालयाने २१ डिसेंबपर्यंत वाढवली. १७ डिसेंबरला पहाटे गुन्हे शाखेने त्यांना मुंबईतून अटक केली होती. रिपब्लिक वाहिन्यांचे ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा, अधिकारांचा गैरवापर करत दर्शकांचा कल, ‘टीआरपी’, स्पर्धक वाहिन्यांची गुपिते एआरजीचे संचालक, सीईओ यांच्याकडे फोडली. गेल्या चार वर्षांत या सहकार्य, मार्गदर्शनाबद्दल एआरजीकडून त्यांना लाच देण्यात आली, असा आरोप गुन्हे शाखेने ठेवला आहे.