मुंबई : कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या सोळाव्या टप्प्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. ‘तापी १’ हे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) सहार रोड मेट्रो स्थानक येथे भुयारीकरण पूर्ण करून बाहेर आले. ‘तापी १’ (टीबीएम) यंत्राने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ ते सहार रोड मेट्रो स्थानक हे ६८७मीटर अंतराचे भुयारीकरण पूर्ण केले. या मार्गिकेनंतर ‘मेट्रो ३’च्या भुयारीकरणाचा सोळावा टप्पा पूर्ण झाला. या भुयारामुळे ‘मेट्रो ३’च्या एकूण मार्गिकेवरील ३१.६८७ किमी भुयारीकरण आता पूर्ण झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ येथून २२ एप्रिल २०१९ रोजी ‘तापी १’ने भुयारीकरणाला सुरुवात केली होती. पॅकेज ६ अंतर्गत सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल २) ते सहार रोड या टप्प्यातील अप आणि डाऊन अशी दोन्ही भुयारे पूर्ण झाली असून, ‘मेट्रो ३’ने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

सोळाव्या टप्प्याचे भुयारीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी जवळपास १०५ दिवसांचा कालावधी लागला. या मार्गिकेवर भुयारीकरणादरम्यान कोणताही अडथळा आला नाही. हा भुयारी टप्पा जमिनीपासून २५ मीटर खोलवर आहे. या ६८७ मीटर भुयारासाठी एकूण ४८८ सेगमेन्ट रिंग्जचा वापर करण्यात आल्याचे ‘मेट्रो ३’ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जमिनीखालून धावणाऱ्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर एकूण २७ थांबे असणार आहेत. भुयारीकरणासाठी सध्या १७ टीबीएम यंत्रे कार्यरत आहेत. टीबीएम यंत्रे उतरवण्यासाठी मार्गिकेवर मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) खोदण्यात आली आहेत.