News Flash

कृत्रिम परानिशी कासवाचा मुक्त जलविहार

या केंद्रात ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून भारतातील हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

प्रत्यारोपणाचा भारतातील पहिला प्रयोग डहाणूत यशस्वी

एखाद्या अपघातात हात किंवा पाय गमावलेल्या व्यक्तीला कृत्रिम अवयव बसविण्याचा प्रकार नेहमीच ऐकतो. पण, डहाणूच्या एका डॉक्टरांनी एका पंख गमावलेल्या कासवाला कृत्रिम पर बसविण्याची करामत साधली आहे. एखाद्या कासवावर कृत्रिम अवयवाचे प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. या कृत्रिम परामुळे हे कासव पूर्वीसारखेच पाण्यात पोहू लागले आहे.

डहाणूत ‘एन्जुअर्ड सी-टर्टल ट्रीटमेंट अ‍ॅण्ड ट्रान्झिट सेंटर’ हे राज्यातील कासवांवरील उपचारासाठीचे एकमेव केंद्र आहे. या केंद्रात ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून भारतातील हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे. जखमी अवस्थेत आढळणाऱ्या कासवांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईस्थित पशुवैद्य डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी डहाणू येथे ‘वाईल्ड लाइफ कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ आणि वनखात्याच्या सहकार्याने कासवांवरील उपचार केंद्र सुरू केले आहे. येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या सागरी कासवांवर उपचार आणि त्यांचे संगोपन करण्यात येते.

काही दिवसांपूर्वी डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरदेखील असेच एक कासव जखमी अवस्थेत आढळले होते. त्याचे पुढील दोन्ही पर तुटले होते. सागरी कासवांना पुढे दोन पंखवजा पाय असतात. ते बहुतेकदा जाळ्यात अडकून जखमी होतात. या कासवाच्या बाबतीतही तसेच घडल्यामुळे त्याला हालचाल करणे अशक्य बनले होते. मात्र, डॉ. विन्हेरकर यांनी कासवाला कृत्रिम पर बसवण्याचा निर्धार करत त्याला फायबर-प्लास्टिकचा एक पर बसविला. हाडाला जोडल्याने कासवाला त्याचा वापर करता येणे शक्य होईल, हा त्यांचा अंदाज खरा ठरला आणि पंख बसवल्यानंतर तासाभरातच कासवाने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. ते चक्क पोहू लागले.

‘चार दिवस सतत हा पर कासवासोबत ठेवल्यावर चार दिवसांनी पुन्हा काढण्यात आला. तेव्हा तेथे कोणतीही जखम नव्हती. फायबर व प्लास्टिक समुद्रात नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे हा पर टिकेल. तसेच याने कासवाला कोणतीही इजा होणार नाही,’ असे डॉ. विन्हेरकर यांनी नमूद केले.

मच्छीमारांचा निष्काळजीपणा

मच्छीमार समुद्रातून मासेमारी करून उदरभरण करत असले तरी हे करताना सागरी संपत्तीचे नुकसान होऊ न देण्याचे भान त्यांना रहात नाही. मासे पकडायची जाळी तुटली की ती तशीच समुद्रात फेकली जातात. या जाळ्यांमध्ये अडकून अनेक समुद्री कासवे मृत्युमुखी पडतात किंवा त्यांचे पुढील पर जाळीत अडकून तुटल्याने ते जखमी होतात. अशी जखमी कासवे किनाऱ्यावर येऊन निपचित पडतात आणि कालांतराने हाल होऊन त्यांचा मृत्यू होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:17 am

Web Title: turtle with artificial wing
Next Stories
1 गृहनिर्माण संस्थांसाठी १० लाखांची बक्षिसे
2 संदीप आचार्य यांना ‘राजहंस पुरस्कार’
3 ‘आयआरसीटीसी’ला ६०० कोटींचा झटका!
Just Now!
X