वाढलेल्या प्रेक्षकवर्गासाठी वाहिन्यांच्या नव्या योजना

एकीकडे टेलिव्हिजन माध्यमाला डिजिटल तंत्रज्ञानाने मोठे आव्हान उभे केले आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे पर्याय धुंडाळणाऱ्या वाहिन्यांना ‘बार्क’च्या नव्या अहवालामुळे आणखी एक दार खुले झाले आहे. देशभरात घरटी टीव्ही असणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून शहरापेक्षा ग्रामीण भागात टीव्हीचा टक्का वाढला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकसंख्या अचानक वाढलेली नाही. तर ग्रामीण भागातील आशयही टीव्हीवर दिसू लागल्याने तेथील प्रेक्षक नव्याने टीव्हीशी जोडला गेला असून आता या प्रेक्षकवर्गाला बांधून ठेवण्यासाठी वाहिन्या प्रयत्नशील आहेत.

‘बार्क’ने गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणावरून जो अहवाल प्रकाशित केला आहे, त्यात देशभरातील घरटी टीव्ही असणाऱ्यांची संख्या १५४ दशलक्षवरून १८३ दशलक्षएवढी झाली आहे. देशभरातील टीव्ही असणाऱ्या घरांच्या संख्येत १९ टक्के वाढ झाली असून त्यातले ९९ दशलक्ष टीव्हीधारक हे ग्रामीण भागातील असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागात काहीएक प्रमाणात प्रेक्षकवर्ग आहे हे अंदाजे धरून चालणाऱ्या वाहिन्यांना या अहवालाने बळ मिळाले आहे. आपल्याकडे टेलिव्हिजनची बाजारपेठ वेगवेगळ्या कप्प्यांत विभागली गेली आहे. अजूनही घरात टीव्ही नसलेला असा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. लोकांच्या उत्पन्नात जशी वाढ होईल, तसा हाही प्रेक्षकवर्ग टेलिव्हिजनशी जोडला जाईल. मात्र आता ग्रामीण भागात डिजिटायझेशनच्या प्रक्रियेमुळे अगदी दुर्गम भागातही सेट टॉप बॉक्स आले आहेत. टीव्हीधारकांची संख्या वाढली आहे, अशी माहिती ‘स्टार प्लस’ वाहिनीचे सरव्यवस्थापक नारायण सुंदररामण यांनी दिली. मात्र ग्रामीण भागातील टीव्हीधारकांची संख्या अचानक वाढलेली नाही. ‘बार्क’ने ग्रामीण भागातील रेटिंग्जचाही समावेश केल्याने आता तिथला प्रेक्षक लक्षात येतो आहे, असे ठाम मत ‘झी मराठी’चे व्यवसायप्रमुख नीलेश मयेकर यांनी व्यक्त केले.

मराठी मनोरंजन वाहिन्यांचा विचार केला तर ग्रामीण भागातील आशय आता मराठी मालिकांमधून प्रामुख्याने दिसून येतो आहे. ‘बार्क’चा अहवाल येण्याआधीच आम्ही ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सुरू केली होती. सध्या ही मालिका रेटिंग्जमध्ये नंबर वन आहे. त्याचे कारण या मालिका कुठल्याही सेटवर न घडता प्रत्यक्ष गावात, तेथील कलाकारांच्या सहभागाने चित्रित केल्या जातात. त्यामुळे याआधी कुठेतरी फक्त िहदी मालिकांशी जोडला गेलेला प्रेक्षक पुन्हा मराठीकडे वळला आहे. ‘जय मल्हार’मधील खंडोबा, आता राणासारख्या व्यक्तिरेखा ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या असून त्यांच्यामुळे या मालिकांशी प्रेक्षक जोडले गेले आहेत, असे मयेकर यांनी स्पष्ट केले. तर ग्रामीण भागातील हा प्रेक्षकवर्ग किती वेळ टीव्हीसमोर असतो हे लक्षात घेऊनच त्यांच्यासाठी दुपारच्या वेळेतही नवीन मालिका देण्यासारखे प्रयोग करण्यात येत असल्याचे सुंदररमण यांनी सांगितले.

दुर्गम भागांतही सेट टॉप बॉक्स

टेलिव्हिजनची बाजारपेठ विभागली गेली आहे. अजूनही घरात टीव्ही नसलेला असा एक मोठा वर्ग आहे. उत्पन्नात जशी वाढ होईल, तसा हाही प्रेक्षकवर्ग टेलिव्हिजनशी जोडला जाईल. मात्र आता ग्रामीण भागात डिजिटायझेशनच्या प्रक्रियेमुळे अगदी दुर्गम भागातही सेट टॉप बॉक्स आले आहेत.