19 January 2019

News Flash

दोघा पोलिसांच्या सतर्कतेने मुंबईतील व्यावसायिकाची सुटका

व्यावसायिक वाद तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीतून हे अपहरण करण्यात आले होते.

अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केल्याबद्दल दिनेशसुमार शर्मा यांनी होलिस हवालदार आण्णा बर्डे व देवीदास उमाप यांचा गौरव केला. यावेळी सहायक अधीक्षक अक्षय शिंदे उपस्थित होते.

नगरमधील थरार, एकाला अटक, लोणावळ्यातून अपहरण

लोणावळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या मुंबईतील व्यावसायिकाची आज, रविवारी पहाटे नगर शहरातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या दोघा हवालदारांच्या मदतीने सुटका करण्यात आली. अपहरणकर्त्यां एकाला अटक करण्यात आली तर तिघे पसार झाले. शहरातील जुन्या बसस्थानकालगत हा पाठलागाचा थरार घडला. अटक केलेल्याला लोणावळा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. व्यावसायिक वाद तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीतून हे अपहरण करण्यात आले होते. मात्र ज्याचे अपहरण करायचे त्याऐवजी दुसऱ्याच नातेवाईकाचे अपहरण झाले.

शुक्रवारी दुपारी दिनेशकुमार रामेश्वर शर्मा (५१, मुळ रा. अंधेरी, मुंबई, सध्या लोणावळा) यांची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. दिनेशकुमार शर्मा यांचेच जवळचे नातेवाईक राम गुलाब शर्मा (मुळ रा. अंधेरी, सध्या लोणावळा) यांचे अपहरण करण्याचा डाव होता. पोलिसांनी दाऊ सऊ मरगळे (२३, पवनानगर, मावळ, पुणे) याला अटक केली आहे. आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल अब्दुल सत्तार चौहाण असे त्याचे नाव आहे. तोच या अपहरणाचा सूत्रधार आहे. इतर आणखी दोघा आरोपींची ओळख पटली नसल्याचे लोणावळा शहरचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांनी सांगितले.

मुळचे उत्तर प्रदेशातील असलेले शर्मा कुटुंबीय इंटेरिअर, इस्टेट एजंट व हॉटेलच्या व्यवसायात आहेत. दिनेशकुमार शर्मा यांचा मुलगा उज्वल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार राम शर्मा यांनी साहिल चौहान याला एक बंगला भाडय़ाने दिला होता तसेच एक हॉटेलही चालवण्यास दिले होते. त्याच्याच पैशाच्या देवाण-घेवाणीतून व खंडणी वसूल करण्यासाठी अपहरण करण्यात आले. साहिलने राम शर्मा यांना बोलवले, मात्र त्याऐवजी दिनेशकुमार शर्मा शुक्रवारी दुपारी तेथे गेला व चौघांनी त्याला बळजबरीने होंडा सिटी (एमएच ०४ सीडी ५७०८) कारमध्ये बसवून अपहरण केले. तेथून त्यांना पुण्यात आणण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या पायावर चाकूने वारही करण्यात आला. नंतर ते शर्मा यांना घेऊन नगरकडे आले. दरम्यान याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

पहाटे साडेतीनच्या सुमाराला जुन्या बसस्थानकाजवळ कार उभी करण्यात आली. तिघेजण चहा पिण्यासाठी गेले व एकजण, दाऊ मरगळे शर्मा यांच्याजवळ थांबला. मरगळे याला डुलकी लागल्याचे पाहून शर्मा कारमधून बाहेर आले, जवळच दोन पोलीस असलेले दिसले, त्यांच्याकडे ते धावत गेले. हे दोघे पोलीस कोतवाली पोलीस ठाण्याचे आण्णा बर्डे व देवीदास उमाप होते. काल, गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे दोघेही पुतळा बंदोबस्तासाठी बाजार समिती चौकात तैनात होते. शर्मा यांनी त्यांना पळवून नेले जात असल्याची माहिती दिली. बर्डे व उमाप हे शर्मा यांना घेऊन कारकडे येत असतानाच चहा पिण्यासाठी गेलेले तिघे परत येत होते व कारमध्ये बसलेला मरगळेही बाहेर आला होता. पोलिसांना पाहून ते पळू लागले, त्यातील मरगळे याला पकडण्यात आले. कारमधून तीन चाकू व एक सत्तूर जप्त करण्यात आला. शर्मा यांच्या माहितीनुसार अपहरणकर्त्यांकडे गावठी कट्टाही होता. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, कोतवालीचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी चौकशी करून सकाळी याची माहिती लोणावळा पोलीस व शर्मा कुटुंबीयांना दिली. शर्मा कुटुंबीयांनी नगरमध्ये येऊन पोलीस बर्डे व देवीदास उमाप यांचा सत्कार केला.

First Published on April 16, 2018 4:12 am

Web Title: two police alert help to rescued businessman of mumbai from kidnapped