उद्धव ठाकरे यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा

शेतकऱ्यांना नाडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पीक विमा कंपन्यांना दिला. विमा कंपन्यांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून पैसे जमा केले आहेत. परंतु नुकसान भरपाई देण्याची वेळ आली की, त्या हात आखडता घेतात. शेतकऱ्यांना नाडणाऱ्या या विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. शेतकऱ्यांना नाडाल तर ती बंद करू, असा आक्रमक पवित्रा ठाकरे यांनी घेतला. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे शिवसेनेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

पीक विम्याच्या अडचणींबाबतचे अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून गरज पडल्यास शेतकऱ्यांना त्यांच्यासमोर उभे केले जाईल, असे ठाकरे म्हणाले. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत आहे, असे नमूद करून ठाकरे म्हणाले, की समोरच्याला जी भाषा कळते ती भाषा आम्ही बोलतो. तरीही त्याला समजले नाही, तर आम्ही आमच्या भाषेत समजावू.