उद्धव ठाकरे यांची शिवसेना नगरसेवकांना तंबी; प्रस्तावावरून जेरीस आणल्याने नाराजी

पालिका सभागृह, स्थायी समिती, सुधार समितीसह सर्व वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये प्रत्येक प्रस्तावावरुन जेरीस आणणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांबरोबर मैत्री कसली करता, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी कठोर स्वरात दिलेल्या तंबीमुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था शिवसेना नगरसेवकांची झाली आहे. पालिका कार्यालयात दररोज भेटणाऱ्या भाजप नगरसेवकांशी अबोला कसा धरायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.

गेली २०-२२ वर्षे शिवसेना-भाजप युतीने मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली. वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदावरुन झालेली कुरबुरी वगळता युतीचा कारभार गुण्यागोविंदाने सुरू होता. नरेंद्र मोदी यांच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रे आली आणि भाजपचा सूरच बदलला. अखेर विधानसभा आणि त्यामागोमाग आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती भंगली आणि उभयतांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. राज्यात भाजपची, तर महापालिकेत पालिकेची सत्ता आली.

महापालिकेत शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने ‘पारदर्शकते’च्या पहारेकऱ्याची भूमिका घेतली. स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीपासून भाजपच्या पहारेकऱ्यांनी शिवसेनेला प्रत्येक प्रस्तावावरुन ठणकावण्यास सुरुवात केली. काही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिवसेनेला विरोधी पक्षांची मदत घ्यावी लागली. तर काही प्रस्ताव मंजूर होवू नयेत म्हणून काँग्रेसने भाजपला साथ दिली. एकूणच पालिका सभागृह आणि स्थायी समितीसह वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये शिवसेना अडचणीत येवू लागली आहे.

एकाबाजूला उभय पक्षांमधील दुरावा वाढत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना आणि भाजपमधील  नगरसेवकांमधील मैत्री ज्येष्ठांच्या नजरेत भरू लागली आहे. भाजप नगरसेवकांबरोबर मैत्री जपणाऱ्या शिवसेनेतील नगरसेवकांची एका ज्येष्ठ नगरसेवकाने काही दिवसांपूर्वी दस्तुरखुद्ध उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार केली. त्याचे पडसाद अलिकडेच पार पडलेल्या शिवसेना नगरसेवकांच्या आढावा बैठकीत उमटले.

स्वपक्षातील कोणत्याही नगरसेवकाचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नगरसेवकांची मैत्रीपूर्ण संबंध जपणाऱ्यांची कानउघाडणी केली. ‘भाजपच्या नगरसेवकांशी मैत्री कसली करता’, अशा कठोर शब्दात त्यांनी नगरसेवकांना सुनावले. त्यामुळे भाजप नगरसेवकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या शिवसेना नगरसेवकांच्या पोटात भितीने गोळा उठला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपले नाव घेतले नाही यामुळे त्यांच्या मनावरचे दडपण थोडे हलके झाले.

थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यामुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये दुही निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजप नगरसेवकांबरोबर मैत्री असलेले नगरसेवक आपल्या मनातील खंत आपापसात कुजबुजू लागले आहेत. मैत्रीला जात, धर्म, पंथ असा भेदाभेद नसतो. मग त्याला पक्षाची बंधने तरी कशाला घालायची, असे शिवसेनेतील काही नगरसेवकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.