नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारीपदावर वर्णी लागावी म्हणून दोन पत्रकारांची धडपड सुरू असून, या पत्रकारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात खासगी व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्याची तरतूद आहे. मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात कितीही जणांची विशेष कार्यकारी अधिकारीपदावर नियुक्त करू शकतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात दोन पत्रकारांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. ठाकरे यांच्या कार्यालयात वर्णी लागावी म्हणून मुंबईतील दोन पत्रकारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीही घेतल्याचे समजते. मुख्यमंत्री कार्यालयात नव्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अद्यापही नियुक्ती झालेली नाही. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर ठाकरे यांनी जुन्याच काही कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात कायम ठेवले. हिवाळी अधिवेशन संपल्यावर नवे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल. मुख्यमंत्री ठाकरे हे दोन पत्रकारांच्या दबावापुढे झुकतात का, हे बघायचे.