‘विशिष्ट ओळख क्रमांक’चे स्टिकर चिकटवण्यास पालिकेतूनच विरोध

प्रत्येक करपात्र इमारतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून मुंबईतील इमारतीवर ‘विशिष्ट ओळख क्रमांक’ (युनिक आयडेंटिटी नंबर -यूआयडी) लावण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. मात्र पालिकेच्याच सुरक्षा रक्षकांनी या मोहिमेला सुरुंग लावत पुरातनवास्तूचा उत्तम नमुना असलेल्या पालिका मुख्यालयावर ‘एकमेव ओळख क्रमांका’चा स्टिकर चिकटविण्यास पालिका कर्मचाऱ्यांनाच मनाई केल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या या मोहिमेला मुख्यालयातूनच विरोध असताना अन्य इमारतींमधील रहिवासीही ‘यूआयडी’ला विरोध करून लागले आहेत. विशेष म्हणजे, एका उच्चभ्रू वसाहतीत ‘यूआयडी’चे स्टिकर लावण्यास गेलेल्या एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावल्याचाही प्रकार घडला आहे.

मुंबईमधील तब्बल २ लाख २५ हजार इमारती मालमत्ता कराच्या कक्षेत आल्या आहेत. या सर्व इमारतींवर ‘विशिष्ट ओळख क्रमांका’चा स्टिकर चिकटविण्याचे काम पालिकेमार्फत सुरू झाले आहे. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाणीपट्टी, मालमत्ता कर भरणा, विविध अनुज्ञापने, गुमास्ता परवाना, विविध परवानग्यांचे नूतनीकरण, नवीन परवाना काढणे आदींची नोंद भविष्यामध्ये या क्रमांकाच्या आधारे होणार आहे. या क्रमांकामुळे एखाद्या इमारतीची तसेच तेथील रहिवाशांची इत्थंभूत माहिती पालिकेला झटकन मिळवता येऊ शकेल. परंतु, या मोहिमेबाबत पालिकेच्या सुरक्षायंत्रणेलाच सूचना न मिळाल्याने पालिका मुख्यालयाच्या इमारतीवर स्टिकर लावण्यास पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मनाई केल्याचे समोर येत आहे. पालिका मुख्यालयाची वास्तू पुरातन वास्तूंच्या यादीमध्ये येत असल्यामुळे असा स्टिकर चिकटवता येणार नाही, असे कारण पुढे करीत पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पालिका कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. आता पालिका मुख्यालयाच्या इमारतीवर दस्तुरखुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीमध्ये हा स्टिकर चिकटविण्यात येणार असल्याचे समजते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवर स्टिकर्स चिकटविण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनाही तेथील सुरक्षा रक्षकांकडून विरोध झाला होता. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विषय समजून घेतल्यानंतर इमारतीला स्टिकर चिकटविण्याची परवानगी दिली.

पालिकेच्या या मोहिमेबाबत सर्वसामान्य नागरिकांनाही फारशी कल्पना नसल्याने स्टिकर लावायला गेलेल्या कर्मचाऱ्यांशी इमारतीमधील रहिवाशांशी वाद होण्याचे प्रसंग घडत आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी लावलेले स्टिकर रहिवाशांनी काढून फेकल्याचेही समजते.

श्वाान दंशाचा प्रसाद

चर्चगेट परिसरातील महर्षि कर्वे मार्गावरील ब्ल्यू मून इमारतीमध्ये ‘यूआयडी’चा स्टिकर चिकटविण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्याचा तेथील एका गॅरेजमधील कुत्र्याने चावा घेतल्याची घटना नुकतीच घडली. या कर्मचाऱ्याला सेंट जॉर्जेस रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावे लागले. याप्रकारानंतर पालिका कर्मचारीही धास्तावले आहेत.

यूआयडीम्हणजे काय?

पालिकेमध्ये दस्तावेज हाताळताना पारदर्शकता आणि गतिमानता यावी म्हणून प्रत्येक इमारतीला ‘विशिष्ट ओळख क्रमांक’ (यूआयडी) देण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. मालमत्ता कराच्या देयकावर नमूद केलेला लेखा क्रमांक (अकाऊंट नंबर) हाच प्रत्येक इमारतीचा एकमेव क्रमांक आहे. हा लेखा क्रमांक १५ आकडी असून त्यामधील पहिले ११ आकडे त्या इमारतीचा ‘एकमेव ओळख क्रमांक आहे. रहिवाशांनी मागणी केल्यास लेखा क्रमांकामधील पुढील चार आकडय़ांचा वापर त्याच इमारतींमधील सदनिकांना स्वतंत्र ‘यूआयडी’ देण्यासाठी करण्यात येणार आहे.

‘विशिष्ट ओळख क्रमांका’चा करदात्यांनाच फायदा होणार आहे. विविध कर भरणाऱ्या करदात्यांना अर्जामध्ये हा क्रमांक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर, परवाने, इमारतीबाबतची महत्त्वाच्या माहितीची या क्रमांकावर नोंद होणार आहे. त्यामुळे भविष्यात या एका क्रमांकावर आपल्या इमारतीची सर्व माहिती संबंधित रहिवाशांना मिळणार आहे. त्यासाठी विविध विभागांमध्ये खेटे घालण्याची वेळ येणार नाही.

पराग मसुरकर, सहाय्यक आयुक्त, मालमत्ता विभाग.