ठोस पर्याय शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : एकाही विद्यार्थ्यांला करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विविध पर्याय पडताळून पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विद्यापीठांना दिले.

अंतिम वर्षांसाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरीइतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र या बैठकीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरूअसलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून परीक्षा घ्याव्यात याच दृष्टीने पर्यायांचा विचार केला जात असल्याचे सामंत यांनी सांगितले. तर परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी असे नियोजन असेल. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

* राज्यातील करोनाची स्थिती पाहता जुलैमध्ये परीक्षा शक्य नाही हे स्पष्ट होऊ लागले आहे. केरळ आणि गोवा राज्यांतील परिस्थितीही आटोक्यात आली असे म्हणता म्हणता बदलली आहे. आपल्याकडे मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परिस्थितीही सतत बदलते आहे. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत पर्याय शोधा.

* सरासरी गुण किंवा श्रेणी आणि रोजगार किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या गुण/श्रेणी मिळविण्यासाठी परीक्षा देण्याची ऐच्छिक सुविधा यांसह विविध पर्यायांचा विचार करावा.

* करोनासारख्या संकटांचा विचार करून शिक्षण, उद्योग आणि कार्यालये सुरू राहतील अशी पद्धती विकसित करावी. त्यासाठी उत्तम संपर्क यंत्रणा वाढविता येईल का, याचा विचार करावा.

*  शिक्षण सुलभतेने घरच्या घरी कसे दिले जाईल याचा विचार करून ई-लर्निग, डिजिटल क्लास रूम्स अशा पर्यायांचाही विचार करावा