रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे प्रारूप सादर; लवकरच कार्यवाही 
मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे मानले गेलेले वांद्रे स्थानक ‘उपनगरांची राणी’ म्हणून ओळखले जाते. या वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी थेट ‘युनेस्को’ने रेल्वे मंत्रालयाकडे शहरी विकास आराखडा पाठवला आहे. या आराखडय़ाचा पहिला अहवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीचा दुसरा अहवालही येत्या दोन महिन्यांत अपेक्षित आहे. या आराखडय़ानुसार वांद्रे स्थानकाच्या आसपासच्या परिसराचा विकास करून तो परिसर प्रवाशांना चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी सोयीचा बनवण्याचा विचार करण्यात आला आहे.
वांद्रे स्थानकाबाहेर सध्या प्रचंड प्रमाणात अतिक्रमणाचे चित्र बदलण्यासाठी आता थेट ‘युनेस्को’नेच पुढाकार घेतला असून ‘युनेस्को’ने या स्थानकाच्या विकासासाठीचा एक आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाचा पहिला अहवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या आराखडय़ात स्थानकाभोवतीच्या परिसराचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. या नूतनीकरणाच्या आराखडय़ानुसार वांद्रे स्थानकाबाहेर पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठीच्या योजनांचा समावेश आहे. त्याशिवाय स्थानकाच्या बाहेरील परिसराचे सुशोभीकरणही या आराखडय़ात प्रस्तावित आहे. अपंगांना स्थानकात शिरणे सोपे व्हावे, यासाठीच्या उपाययोजनांचाही यात समावेश आहे. रेल्वेने वांद्रे स्थानकाच्या विकासासाठी थेट ‘युनेस्को’शी बोलणी केली असून त्यानुसार हा अहवाल तयार झाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वांद्रे स्थानकाच्या विकासाचा आग्रह धरला आहे.