News Flash

रेल्वेप्रवासाचे सुखचित्र!

१५० किमी लांबीचे उपनगरीय जाळे निर्माण करण्यासाठी ४० हजार कोटी रुपये देत असल्याचे जेटली यांनी जाहीर केले.

 • उपनगरीय रेल्वेसाठी ५१ हजार कोटींचा निधी
 • सीएसएमटी-पनवेल जलद मार्गासाठी तरतूद
 • पनवेल-विरार मार्ग, हार्बर विस्तारालाही पाठबळ
 • सर्व रेल्वेस्थानकांत सीसीटीव्ही, वायफाय

घोषणा होऊनही गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेवरील प्रकल्पांना निधीचे बळ देत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुरुवारी रेल्वे प्रवाशांना भविष्यातील सुखद प्रवासाचे चित्र दाखवले. सीएसएमटी-पनवेलदरम्यान जलद रेल्वेमार्ग उभारण्यासोबतच पनवेल-विरार प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी अर्थमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. त्यासोबतच हार्बरचा बोरिवलीपर्यंतचा विस्तार, २१० वातानुकूलित लोकलगाडय़ा, सर्व स्थानकांत वायफाय व सीसीटीव्ही, सरकते जिने अशा पूर्वघोषित प्रकल्पांच्या पूर्ततेला या निधीद्वारे वेग येणार आहे.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ‘एमयूटीपी-३’ अंतर्गत ५४ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवले होते. यामध्ये सीएसएमटी-पनवेल जलद मार्गासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना उपयुक्त ठरणारे हार्बरचे बोरिवलीपर्यंतचे विस्तारीकरण आणि बोरिवली-विरारदरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा प्रकल्पही यात समाविष्ट होता. यातील बहुतांश प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी निधी पुरवला आहे. संसदेत गुरुवारी अर्थसंकल्प मांडताना अरुण जेटली यांनी मुंबईतील ९० किमी लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. यासोबतच १५० किमी लांबीचे उपनगरीय जाळे निर्माण करण्यासाठी ४० हजार कोटी रुपये देत असल्याचे जेटली यांनी जाहीर केले.

यामध्ये काही मार्गावर उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येईल, असेही त्यांनी भाषणादरम्यान सांगितले. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या उभारणीला वेग येणार आहे. हार्बरवरील सीएसएमटी ते पनवेल हा सध्या ७५ मिनिटे अवधीचा प्रवास जलद मार्गामुळे ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

या उन्नत जलद मार्गासाठी १२ हजार ३३१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबतच ‘एमयूटीपी-३’ अंतर्गत आखलेल्या अन्य प्रकल्पांनाही गती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांसाठी केंद्राने ४११ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

हा प्रकल्प ११ हजार कोटी रुपये किमतीचा आहे. यामध्ये वसई-विरार चौपदरीकरण, पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्गाना गती मिळण्याची आशा आहे.

या प्रकल्पांना निधी

 • सीएसएमटी-पनवेल जलद उन्नत मार्ग
 • पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्ग.
 • कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग.
 • हार्बरचा गोरेगाव-बोरिवली विस्तार.
 • बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका.
 • कल्याण-बदलापूर तिसरा, चौथा मार्ग
 • कल्याण-आसनगाव चौथा मार्ग

२१० वातानुकूलित लोकल

सध्या धावत असलेल्या लोकल गाडय़ांऐवजी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा चालविण्याचे नियोजन असून त्यालाही अर्थसंकल्पात स्थान मिळाले आहे.

१५ स्थानकांचा कायापालट

‘एमयूटीपी ३ ए’अंतर्गत १५ स्थानकांत सरकते जिने, लिफ्ट, प्रसाधनगृहे इत्यादी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, विरार तर मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील, सायन, घाटकोपर, मुलुंड, डोंबिवली, शहाड आणि हार्बरवरील वडाळा, चेंबूर, जीटीबी नगर या स्थानकांचा समावेश आहे.

वायफाय, सीसीटीव्ही सुविधा

लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय तसेच सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्याने मुंबईतीलही सर्व स्थानकांत या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

सर्व स्थानकांवर सरकते जिने

२५ हजारापेक्षा जास्त प्रवासी संख्या असलेल्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली. त्यानुसार मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील बहुतांश स्थानकातील प्रवासी संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्व स्थानकांवर सरकते जिने बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 2:38 am

Web Title: union budget 2018 railway budget 2018
Next Stories
1 मुंबईकरांवर नवा करभार?
2 अखेर ‘कोयला’वर पालिकेचा हातोडा
3 शिवडी, गोराई पाणथळ परिसर धोक्यात
Just Now!
X