संशोधनासाठी भरीव तरतूद

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०१९-२० वर्षांचा ६९५ कोटी रुपये खर्चाचा आणि ६८.८१ तुटीचा अर्थसंकल्प गुरुवारी अधिसभेत मंजूर करण्यात आला. संशोधनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांंच्या स्टार्टअप्सना इन्क्युबेशन केंद्राच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल. खासगी कंपन्यांनाही या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. इन्क्युबेशन केंद्रासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय संशोधकांना अभ्यासवृत्तीही देण्यात येणार असून त्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नव्या संशोधनासाठी अर्थसाहाय्य, पुस्तक प्रकाशन यासाठी हा निधी वापरता येईल. मूल्यांकनात श्रेणी वाढण्यासाठी करायच्या उपाययोजनांसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तरतुदी (रुपयांमध्ये)

’ संशोधकांना मानधन- ३ कोटी २५ लाख

’ कुलगुरू अभ्यासवृत्ती योजना – ९० लाख

’ इन्क्युबेशन केंद्र – १ कोटी ५० लाख

’ महिलांसाठी कल्याणकारी योजना- १ कोटी ५० लाख

’ जगातील उत्कृष्ट १०० विद्यापीठांत समाविष्ट होण्यासाठी निकष पूर्ततेसाठी –  १५ लाख

’ आंतरराष्ट्रीय सहयोग कक्ष – ५ लाख

’ तज्ज्ञ अभ्यागत प्राध्यापकांचे मानधन – १ कोटी

’ प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र- १ कोटी

’ झाराप आणि सिंधुदुर्ग येथील प्रस्तावित परिसरासाठी – २ कोटी

’ पालघर येथील प्रस्तावित परिसरासाठी- १ कोटी

’ सेंटर फॉर एक्सेलेंस इन स्पोर्ट्स- १ कोटी

’ ग्रंथालयाचे नूतनीकरण- ३ कोटी

’ कॅम्पस डेव्हलपमेंट- १.५ कोटी

’ विद्यार्थी कल्याण निधी- १ कोटी

’ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये सहभागासाठी- ५ लाख

’ आदिवासी भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी- ६० लाख

’ विद्यापीठातील उत्कृष्ट विद्यार्थी (पुरुष/महिला)- १ लाख

’ यूपीएससी कोचिंगसाठी- २ लाख

’ शैक्षणिक विद्वतेची जोपासना, बौद्धिक संपत्ती हक्क (आयपीआर, पेटंट)- ५ लाख

’ नवसंशोधनासाठी- ५ लाख

’ आरक्षित विद्यार्थ्यांना वित्तीय मदत- ४२ लाख

’ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी- ६० लाख

’ विद्यापीठातील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन- १० कोटी

’ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना- १० लाख

’ विद्यापीठ परिसरातील सुरक्षा- १ कोटी

’ डेटा सेंटर- ७५ लाख

’ कन्व्हेंशन सेंटर- ३ कोटी

’ दस्तऐवज संगणकीकरण- १ कोटी २५ लाख

’ कौशल्य विकास- १ कोटी ५० लाख

’ विद्यार्थी भवन- २ कोटी

पारितोषिके आणि परदेश दौरे

उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी, उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक, उत्कृष्ट संशोधनात्मक काम करणारे शिक्षक, उत्कृष्ट अधिसभा सदस्य यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कुलगुरू अभ्यासवृत्तीसाठी योजना

यासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना याअंतर्गत विद्यापीठात काम करता येणार आहे. याशिवाय संरक्षण सेवेतील पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी  ५ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. दंगल, दहशवादी हल्लय़ातील प्रभावित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी १ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधवा किंवा एकल पालकांच्या (सिंगल पॅरेन्ट) पाल्यांना आर्थिक मदत करण्यात येणार असून त्यासाठी १ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.