मुंबई विद्यापीठाच्या पदवीची खोटी प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या एका टोळीचा कारभार समोर आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले असून यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे पोलिसांचा दावा आहे.

रत्नागिरीमध्ये असलेल्या फिनोलेक्स अकॅडमीमध्ये एक विद्यार्थी प्रवेशासाठी आला होता. त्यासाठी संबंधीत विद्यार्थ्याने जे गुणपत्रक सादर केले ते बनावट असल्याचा संशय फिनोलेक्सच्या प्रशासनाला आहे. त्यामुळे त्यांनी हे गुणपत्रक मुंबई विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पाठवून दिले. त्यानंतर यातील संशय खरा ठरला. कारण हे गुणपत्रक विद्यापीठाच्या अधिकृत गुणपत्रकांसारखे दिसत असले तरी ते बनावट असल्याचे उत्तर विद्यापीठाने या अकॅडमीला दिले. त्यानंतर अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

या फसवणुकीच्या प्रकाराची तक्रार फिनोलेक्स अकॅडमीच्या प्रशासनाने रत्नागिरीच्या ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदवली. त्यानंतर पोलिसांच्या तपासादरम्यान, यामध्ये फिनोलेक्स अकॅडमीतील खासगी सुरक्षारक्षकाचाही सहभाग उघड झाला असून त्याचा संपर्क थेट मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांशी होता, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी थेट मुंबई विद्यापीठ गाठले आणि विद्यापीठातील डेटा एन्ट्री ऑपरेटर गोरखनाथ गायकवाड आणि महेश बागवे, शिपाई प्रविण वारीक तसेच क्लार्क गणेश मुणगेकर यांना या प्रकरणी ताब्यात घेतले. पकडण्यात आलेली ही टोळी विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या बदल्यात मुंबई विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करुन देत होती.