करोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, लोकलमधून प्रवासाची परवानगी नसल्यानं मुंबईतील डबेवाल्यांना आर्थिक प्रश्नांसह अनेक समस्यांना सामोर जावं लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात होती. अखेर ऑक्टोबरमध्ये डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले आहेत. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील उपनगरी रेल्वेवर पडणारा ताण लक्षात घेऊन उपनगरी गाडय़ांची संख्या वाढविण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले असून मुंबईतील डबेवाल्यांना ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून या गाडय़ांतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान डबेवाल्यांनादेखील रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेत त्यांना निवेदनही दिली होती. अखेर अनलॉक ५ च्या नव्या नियमांमध्ये डब्बेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याने मनसेच्या अधिकृत (व्हेरिफाइड) पेजवरुन ‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’ या मथळ्याखाली एक पोस्ट करण्यात आली आहे.

‘मुंबईतील डबेवाले म्हणजे मुंबईतील नोकरदार वर्गाचे अन्नदातेच, जे रोज न चुकता गेली अनेक दशकं ह्या नोकरदारवर्गाला त्यांचा डबा पोहचवत होते. पण लॉकडाऊननंतरची अनेक ‘अनलॉक’ टप्पे आले पण ह्या डबेवाल्याना त्यांच्या हक्काच्या रेल्वेत प्रवेश द्यावा जे नोकरदार लोंबकळत प्रवास करत मुंबई गाठत आहे त्यांना घरचं जेवण मिळावं हे काही राज्य सरकारच्या ध्यानी आलं नाही. शेवटी न्यायाच्या अपेक्षेने ह्या डबेवाल्यांनी राज यांची भेट घेतली होती आणि आपली व्यथा मांडली. राज यांनी योग्य पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देतो असं आश्वासन दिलं आणि आजच्या ‘अनलॉक’ च्या नियमावलीत डबेवाल्याना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली,’ असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कृष्णकुंजवर न्याय मिळतोच!

मुंबईतील डबेवाले म्हणजे मुंबईतील नोकरदार वर्गाचे अन्नदातेच, जे रोज न चुकता गेली अनेक…

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Wednesday, September 30, 2020

“दोन दिवसांपूर्वी मनसेनं मुंबईत लोकल प्रवास करत सविनय कायदेभंगाचं आंदोलन केलं होतं. बहुतांश मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकलनं प्रवास केला होता. मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत करावी अशी त्यांची मागणी होती. डबेवाल्यांनी महिनाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मुंबईकरांप्रमाणेच डबेवाल्यांची लाईफलाईनही लोकल रेल्वे सेवा आहे. परंतु रेल्वे प्रशासनानं आमची मागणी मान्य केली नाही,” असं राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं होतं.

“आम्हाला लोकलमधून परवानगी देण्यात येत नाही तर किमान अत्यावश्यक सेवांमध्ये आमची सेवा सामावून घेत प्रवास करू देण्यात यावा अशीही विनंती आम्ही केली होती. परंतु तीदेखील मान्य करण्यात आली नाही. आमची मागणी मनसेनं उचलून धरली आणि त्यांनी आंदोलन केलं. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत. मनसेनं आदोलन करून वात पेटवली आहे. त्याचा भडका केव्हाही होऊ शकतो. थोड्याफार प्रमाणात तरी सरकारनं सेवा सुरू करावी,” असंही यावेळी डबेवाल्यांनी म्हटलं होतं.