वादळी पाऊस, गारपीट थांबतच नसून, निसर्गाचे सारे ऋतुचक्र बदलले आहे. शेतकऱ्यांना मदत करायची आहे, पण अवकाळी पाऊस थांबत नसल्याने पंचनामे करणे शक्य होत नाही, असे सांगत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारची मोठी अडचण झाल्याची कबुलीच विधानसभेत दिली.
अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांची परिस्थिती फारच हलाखीची झाली असून, सरकारने वेळीच पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाले आहेत. विविध पिके नष्ट झाल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. तसेच पंचनाम्याचे काम होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानाची जाणीव आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. पण अजूनही पाऊस थांबलेला नाही. आणखी तीन दिवस पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. शेतकऱ्यांना सावध केले जात आहे. पंचनामे सुरू झाले असले तरी मर्यादित कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे या कामावर मर्यादा येत असल्याचे महसूलमंत्री खडसे यांनी सांगितले.
महसूल आणि कृषी खात्यांचे कर्मचारी संयुक्तपणे गावांमध्ये जाणे आवश्यक असते. पण सारीच यंत्रणा सध्या कामात गुंतलेली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर केली जाईल. सरकारपुढे काही अडचणी आहेत याकडे खडसे यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार विलंब लावत असल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला.