‘‘अमृतातेही पैजाजिंकणाऱ्या मराठीशी जिव्हाळ्याचं नातं जोडणारी, शेक्सपीअरशी नातं सांगणारी, कविश्रेष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकरांची दिव्यप्रतिभा. मराठी रंगभूमीला वैश्विक पातळीवर नेऊन ठेवणारी त्यांची असाधारण लेखणी. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटय़लेखन प्रवासाचा घेतलेला हा मागोवा.’’
पिंपळगावच्या (नाशिक) जत्रेत ‘बोहडा’ नावाचा, जवळजवळ दशावतारी नाटकाच्या परंपरेतला ‘खेळ’ सादर व्हायचा. हजारो लोक तो नाटय़प्रकार मनसोक्तपणे उपभोगायचे. पुढे ख्यातकीर्त झालेले नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ तात्यासाहेब. त्यांच्या बालपणी हा ‘बोहडा’ पाहाताना रंगून जायचे. शालेय जीवनात वणी येथील त्यांच्या आत्याच्या घरी, जुन्या कपाटात त्यांना पुस्तकांचे रत्नभांडारच गवसले होते. त्यात कथा, कादंबऱ्या होत्याच, पण गडकऱ्यांची सर्व नाटके होती. ही नाटके वाचून शिरवाडकरांना, काहीतरी अद्भूत गवसल्याचा आनंद झाला. वाचलेले सर्वच काही कळत होते असे नाही, पण गडकऱ्यांच्या भाषेची विलक्षण मोहिनी त्यांच्यावर पडली. त्यांच्या नाटकातील सुधाकर, संभाजी या पात्रांचे उतारेच्या उतारे त्यांनी मुखोद्गत केले आणि सप्तशृंगगडाच्या साक्षीने मोठय़ाने म्हणण्याचा परिपाठ त्यांनी ठेवला. ‘बोहडा’ हा लोकप्रकार आणि गडकऱ्यांची नाटके या दोन गोष्टींमधून शिरवाडकरांनी आपल्या नाटय़कलेचा श्रीगणेशा गिरवला असे म्हणायला हरकत नाही.
कॉलेज जीवनात त्यांनी सिंज, शॉ, मोलियर गॉल्सवर्दी आणि शेक्सपीअर या पाश्चात्य लेखकांचे वाङ्मय वाचले. तोंडाला रंग लावून, कॉलेजच्या रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिकाही केल्या, पण कवितेच्या अधिक प्रेमात पडल्यामुळे नाटक या प्रकाराकडे थोडा कानाडोळा झाला.
गोदावरी सिनेटोनच्या ‘सती सुलोचना’ या बोलपटाच्या निर्मितीत शिरवाडकर सहभागी झाले होते, पण हा बोलपट कोसळला आणि कंपनीची स्थिती डबघाईला आली. कंपनीतील मंडळी बेकार झाली होती. रिकामपणची कामगिरी म्हणून कंपनीतल्या काही लोकांनी नाटक करण्याचा घाट घातला. लेखक अर्थात शिरवाडकर. ‘मोलिअर’च्या ‘मायझर’चे त्यांनी ‘काकासाहेब’ या नावाने रूपांतर केले. तालमी सुरू झाल्या पण तिसरा अंक बसण्यापूर्वीच गोदावरी सिनेटोनने राम म्हटला. ‘काकासाहेब’ बासनातच गुंडाळले गेले.
शिरवाडकर पुढे मुंबईत आले. तिथे मुंबई-मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव यांच्याशी त्यांचा परिचय झाला. भालेरावांनी त्यांच्याकडे नाटक लिहून देण्याची मागणी केली. शिरवाडकरांनी धूळ खात पडलेले ‘काकासाहेब’ भालेरावांच्या हाती सुपूर्द केले आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत बसून राहिले. काही काळानंतर भालेरावांनी ‘काकासाहेब’ विषयी अवाक्षरही न उच्चारता, ‘ऑस्कर वाइल्ड’चे आयडिअल हज्बंड नाटक शिरवाडकरांच्या हाती सोपविले. त्याचे मराठी रूपांतर करण्याचा हुकूमच शिरवाडकरांना केला. शिरवाडकरांनी ‘दूरचे दिवे’ या नावाने त्या नाटकाचे रूपांतर केले.
साहित्य संघ मंदिराच्या नाटय़महोत्सवात ‘दूरचे दिवे’ रंगमंचावर आले, गाजले आणि वि. वा. शिरवाडकर हे नाटककार म्हणून उदयास आले. त्याच्या पुढच्याच वर्षी संघ मंदिराच्या नाटय़ महोत्सवात त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले ‘दुसरा पेशवा’ (इ. स. १९४७) हे नाटक सादर झाले. याही नाटकाने शिरवाडकरांना नाटककार म्हणून नावलौकिक मिळवून दिला, पण या साऱ्या प्रवासात त्यांच्या ‘काकासाहेब’ने मान टाकली ती टाकलीच. पुढे मोलियरच्या मायझरवर आचार्य अत्रे यांनी ‘कवडीचुंबक’ नावाचे नाटक लिहिले. ते प्रचंड गाजले.
‘दुसरा पेशवा’ नंतर मुंबई-मराठी साहित्य संघासाठी शिरवाडकरांनी मॉरिस मेंटरलिंक यांच्या ‘मोना व्हॅना’ या नाटकाचे केलेले रूपांतर म्हणजे ‘वैजयंती’ हे नाटक. साहित्य संघाने हे नाटक ७ मे १९५० रोजी रंगमंचावर आणले. दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, मामा पेंडसे, मा. दत्ताराम इत्यादी मातब्बर कलावंतांनी त्यात भूमिका केल्या होत्या. हेही नाटक यशस्वी झाले. अविस्मरणीय ठरले. त्यानंतरच्या काळात तात्यासाहेबांचे स्वतंत्र मराठी नाटक म्हणजे ‘कौंतेय’ महाभारतातील कर्ण आणि माता कुंती यांच्यातील भावसंबंधाचे समर्थ चित्रण त्यात शिरवाडकरांनी केले आहे. हेही नाटक यशस्वी झाले. मात्र ‘वैजयंती’ आणि ‘कौंतेय’ या नाटकांसंदर्भात शिरवाडकरांना पुण्यात विरोधही सहन करावा लागला. सर्वच कलावंतांना परंपरानिष्ठ आणि प्रस्थापित मूल्यांकडून होणारा छळ नेहमीच सहन करावा लागतो. त्याला इलाज नाही.
शिरवाडकरांनी ‘आमचं नाव बाबुराव’ बेफेट, ‘एक होती वाघीण’, ‘आनंद’, ‘मुख्यमंत्री’, ‘चंद्र जेथे उगवत नाही’, ‘किमयागार’, ‘नटसम्राट’, ‘विदूषक’, ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘ययाती-देवयानी’ अशी अनेक नाटके लिहिली. ती रंगभूमीवर कमी-अधिक प्रमाणात यशस्वीही झाली. संगीत ययाती-देवयानी म्हणजे नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या ‘संगीत विद्याहरण’ या नाटकाचाच पुढचा भाग असे म्हटले तरी चालेल. या सर्व नाटकांमध्ये ‘वीज म्हणाली धरतीला’ हे शिरवाडकरांचे अत्यंत आवडते नाटक. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावर आधारलेले हे ऐतिहासिक नाटक. राणीच्या पराक्रमामुळेच बंडवाल्यांना ग्वाल्हेरला विजय मिळविता आला, पण युद्धाची नवीन मोर्चेबांधणी करण्याऐवजी बंडवाले आणि रावसाहेब पेशवे मशगूल झाले ते
भोजनावळी आणि नाचगाण्यात. उद्वेगाने राणी म्हणते, ‘काय दुर्दैव आहे. आम्ही सारेजण स्वराज्याच्या देवळाकडे जायला निघालो, परंतु आम्ही पोचलो आहोत त्या राजकारणाच्या छिनालखान्यात’. या नाटकात लक्ष्मीबाईचे राणीपण, तिचे स्त्रीपण, उत्तुंग पराक्रम, निर्धार, दूरदृष्टी, श्रद्धा, तिचे मातृत्व यांचे काव्यात्म दर्शन घडविण्याचा शिरवाडकरांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. (संदर्भ- वाटेवरच्या सावल्या- वि. वा. शिरवाडकर, कॉन्टिनेंटल प्रकाशन. ‘तो प्रवास सुंदर होता’- के. रं. शिरवाडकर/ राजहंस प्रकाशन)
नाटय़ात काव्य आणि काव्यात नाटय़मयता असा सुरेख संगम शिरवाडकरांच्या नाटय़लेखन शैलीत दिसून येतो. लेखकाला नाटक नेमके कुठे सापडते, यावर शिरवाडकरांचे उत्तर असे- ‘मला नाटक हे नेहमी व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात आणि भोवतालच्या परिस्थितीशी केलेल्या संघर्षांत सापडलेले आहे.
म्हणजे मला तरी नाटक सहसा घटनेत वा कथानकात सापडत नाही. माणसाचे मन हा नाटकाचा मुख्य विषय असतो. घटनांची गुंतागुंत हा नव्हे.’
‘शेक्सपीअर’ हा शिरवाडकरांचा जिव्हाळ्याचा विषय. त्याबाबतीत ते स्वत:ला शेक्सपीअरच्या नाटय़पंढरीचा वारकरी समजत. ते म्हणतात, ‘ज्ञानेश्वराप्रमाणे शेक्सपीअर कळो अथवा न कळो. वाचत राहिला पाहिजे. केव्हातरी त्याच्या अंतरंगापर्यंत पोचता येईल.’ शिरवाडकरांच्या साहित्यविश्वात शेक्सपीअर हा सम्राटपदी होता. प्रतिभापुरीत वैश्विक व्यवहाराचा खाविंद म्हणजे शेक्सपीअर. एवं शेक्सपीअर त्यांच्या मनात तर शिरलाच होता, पण तो त्यांच्या रक्तातही भिनला होता. त्यातूनच निर्माण झाली ‘मॅकबेथ’ आणि ‘अथेल्लो’ची मराठी रूपांतरे.
अवघ्या मराठी नाटय़विश्वात अत्युच्च आणि अतुलनीय स्थान मिळविणारे शिरवाडकरांचे नाटक म्हणजे ‘नटसम्राट’ (१९७४). या नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. नटवर्य नानासाहेब फाटक व शिरवाडकर यांचा गाढ स्नेह. एका भेटीत नानासाहेबांनी ‘आमच्यासारख्या जुन्या नटांना मानवेल असे एखादे नाटक तुम्ही लिहायला हवे’, अशी माणगी केली. मधे काही वर्षे उलटली. नानासाहेब रंगभूमीवरून निवृत्तही झाले. एके दिवशी अचानक शिरवाडकरांच्या मनात आले- नानासाहेब फाटकांसारख्या नाटय़सृष्टीतील राजेश्वरावरच नाटक का लिहू नये? नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट त्यांच्या मनात उभा राहिला. नानासाहेबांची रंगभूमीवरील वादातीत श्रेष्ठता, तिन्ही सप्तकात चित्त्यासारखा धावणारा आवाज, गुणाढय़ स्वभाव, गुरू गणपतराव जोशींचा प्रचंड अभिमान, जुन्या परंपरा आणि श्रद्धांबद्दलचे, उत्कृट प्रेम या सगळ्या वैशिष्टय़ांनिशी ‘नटसम्राट’ नाटक शिरवाडकरांच्या प्रतिभेतून साकारले.
२३ डिसेंबर १९७०! मुंबईचे बिर्ला-मातोश्री सभागृह. ‘नटसम्राट’ चा पहिला प्रयोग. हा प्रयोग तुफान रंगला. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. ‘नटसम्राट’च्या रूपाने एक अनोखे लेणे नाटय़सृष्टीत अवतरले. या नाटकाचे प्रयोग सातत्याने होत राहिले.
हाऊसफुल्ल! नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगालाच दु:खाचे एक गालबोट मात्र लागले. या नाटकात ‘विठोबा’ची भूमिका करणारे बाबुराव सावंत, पहिल्या प्रयोगानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावले. अंगावरील रंगभूषा, वेशभूषासुद्धा उतरवलेली नव्हती. खरोखरच दुर्दैवी घटना होती ही! ‘नटसम्राट- गणपतराव बेलवलकर’ ताकदीनं उभा करणं ही कलाकाराच्या अभिनयाची कसोटीच. डॉ. श्रीराम लागू,  दत्ता भट,  सतीश दुभाषी,  यशवंत दत्त,  चंद्रकांत गोखले अशा अनेक दिग्गजांनी नटसम्राट समर्थपणे उभा केला. नवीन पिढीतील कलाकारांना हे आव्हानच
आहे.
कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन (२७ फेब्रुवारी १९१२) आपण हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करतो. १० मार्च १९९८ हा त्यांचा निर्वाणदिन. याच महिन्यात येणारा २७ मार्च हा ‘जागतिक रंगभूमीदिन’. विल्यम शेक्सपीअरशी नातं जोडणाऱ्या या अस्सल मराठी नाटककाराचे स्थान, केवळ मराठी पुरतेच मर्यादित नाही, तर ते वैश्विक पातळीवरचे आहे.
त्यांच्या नाटकांच्या मनन, चिंतन, प्रकट वाचनाने रंगभूमीवरच्या सादरीकरणाने जुन्या-नव्या रंगकर्मीना उजाळा मिळेल. त्यांनी या गोष्टीचा ध्यास धरावा हीच अपेक्षा. तुम्हा तो सुखकर हो शंकर!

husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
omprakash raje nimbalkar marathi news
धाराशिव : ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?