मुंबई : गेले नऊ महिने थैमान घातलेल्या करोनाचा शेवट करण्यासाठी लसीकरणास सुरुवात करत क्रांतिकारक पाऊल आपण टाकत आहोत. केंद्राने उपलब्ध केलेल्या लशी सुरक्षित असून आणखी दोन ते तीन कंपन्यांची लस उपलब्ध होणार आहे. तेव्हा सर्वांना लस मिळणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यव्यापी करोना लसीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्रात शनिवारी सकाळी करण्यात आले.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बीकेसी रुग्णालयातील डॉ. मधुरा पाटील आणि डॉ. मनोज पाचंगे या लाभाथ्र्यांना मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लस देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

करोनाने हाहाकार उडविला तेव्हा आम्ही सर्वच गोंधळात होतो. कोणतेही औषध हाताशी नसताना पुढे कसे जायचे असा प्रश्न होता. युद्धपातळीवर बीकेसीचे केंद्र उभे केले. एप्रिल, मेमध्ये हे केंद्र रुग्णांनी तुडुंब भरलेले होते. तरीही जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी, आरोग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आरोग्य यंत्रणा भक्कमपणे सांभाळणारे अधिकारी यामुळे संसर्ग प्रसार रोखण्यात यश आले आहे.

लशीबाबत शंका असल्या तरी केंद्राने सर्व तपासणी करून लस उपलब्ध केली आहे. त्यामुळे लस सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच लस घेतली तरी मुखपट्टीसह, करोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.

लसवाटपाबाबत समानता हवी

राज्याला लशीचा साठा अपुरा प्राप्त झाल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मला ज्याप्रमाणे राज्यातील सर्व नागरिक समान आहेत त्याप्रमाणे पंतप्रधानांनाही देशातील सर्व नागरिक समान आहेत. त्यामुळे लसवाटपाबाबत ही समानता असायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यानी लगावला.

१ कोटी २ लाख लशींचा साठा ठेवण्याची क्षमता

मुंबईत आता १ कोटी २ लाख लशींचा साठा ठेवण्याची क्षमता उपलब्ध झालेली आहे. तसेच दर दिवशी ५० हजारांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यावेळी दिली.