गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तसेच भाविकांची संख्या मोठी असते. यांना राज्य सरकारने दिलासा दिला असून प्रवासातील वेळ वाचावा यासाठी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्यात आली आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. आगामी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देणे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनेबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, कोकणात जाणाऱ्या भाविकांना २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी आणि १, २, ३ आणि ४ सप्टेंबर रोजी टोलमधून सूट देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना पासेस आणि स्टिकर वाटप करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर सायन-पनवेल, खोपोली-पाली-वाकण या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच गर्दीच्या वेळी जड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, क्रेन आणि रुग्णवहिका सेवा तयार ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी संबधितांना यावेळी दिल्या.

कोकणातला गणेशोत्सव हा वैशिष्टपूर्ण असतो. या ठिकाणी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणे सार्वजिनिक गणेशोत्सवासारखे स्वरूप पहायला मिळत नाही. तर घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे मुंबईत कामाधंद्यासाठी आलेले कोकणवासीय गणेशोत्सवासाठी आवर्जून कोकणात आपल्या गावांकडे धाव घेतात.