ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मुजफ्फर हुसेन यांचे मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील विक्रोळीमध्ये निधन झाले. हुसेन ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावार बुधवारी सकाळी विक्रोळी या ठिकाणीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात मुजफ्फर हुसेन यांचे नाव आदराने घेतले जात असे. सामाजिक विषयांवरचे वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

२००२ मध्ये हुसेन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कारही हुसेन यांना २०१४ मध्ये देण्यात आला होता. राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

‘इस्लाम आणि शाकाहार’, ‘मुस्लिम मानसशास्त्र’, ‘दंगोमे झुलसी मुंबई’ ‘अल्पसंख्याक वाद: एक धोका’ ‘इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन’, ‘लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान’, ‘समान नागरी कायदा’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.