घाटकोपरमधील जीवदया मार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या साईटवर कोसळलेल्या विमानाचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ज्या ठिकाणी विमान कोसळलं आहे ती जागा दिसत असून, थोड्याच वेळात तिथे आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन दुर्घटना किती भयानक होती याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. जेव्हा विमान कोसळलं तेव्हा मोठा आवाज झाल्याने लोक घाबरले होते. पण हा आवाज चार्टर्ड विमान कोसळल्याचा असेल असा अंदाजही त्यांना नव्हता. पण या व्हिडीओवरुन आवाज किती मोठा असेल आणि अपघात किती भयंकर होता याचा अंदाज लागू शकतो.

गुरुवारी दुपारी घाटकोपर पश्चिमेकडील पांजरापोळ मैदानात यू वाय एव्हिएशन या कंपनीचे चार्टर्ड विमान कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. हे विमान पूर्वी उत्तर प्रदेश शासनाच्या ताफ्यात होते. यानंतर यू वाय एव्हिएशन या खासगी कंपनीने ते विकत घेतले. २०१५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतल्यानंतर यू वाय एव्हिएशनने हे विमान दुरुस्तीसाठी इंडामेर कंपनीला दिले. २२ कोटी रुपये खर्च करुन या विमानाची दुरुस्ती करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सव्वा बाराच्या सुमारास जुहू विमानतळावरुन हे विमानात आकाशात झेपावले. चाचणीसाठी विमानाने उड्डाण केले होते. चाचणी पार पडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित होते. यानंतर हे विमान यू वाय एव्हिएशन कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार होते. गुरुवारी सकाळी विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानतळावरील कंपनीचे कर्मचारी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसतात. पण हे विमान पुन्हा परतणार नाही याची त्यांनी कल्पनादेखील केली नसेल.