दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून पास झाल्याचे आणि बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याचे नवाब मलिक यांनी सिद्ध केले, तर मी राजकारण सोडून देईन, पण त्यांनी केलेला दावा जर ते सिद्ध करु शकले नाहीत, तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना दिले.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांच्यावर कथित आरोप करताना सांगितले की, तावडे यांनी दहावीच्या परीक्षेला डमी उमेवार बसविला होता, आज त्या डमी उमेदवाराचे वय ४५ वर्षांचे आहे. मलिक यांच्या या दाव्यावर तावडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. मलिक यांचे व्यक्तव्य अतिशय मूर्खपणाचे व बालिशपणाचे आहे. माझे वय आता ५३ वर्षे आहे. त्यामुळे जर मलिक यांच्या दाव्यानुसार, माझ्या जागी बसलेला तो कथित डमी उमेदवार जर आज ४५ वर्षांचा असेल तर माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी तो कथित डमी उमेदवार बहुतेक दुसरी इयत्तेत शिकत असावा, अशा शब्दांत मलिक यांच्या विधानाची तावडे यांनी खिल्ली उडविली.